सफाईत हलगर्जीपणा; ठेकेदाराला सहा लाखांचा दंड   

पुणे : महापालिकेने प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या ‘परफॉर्मन्स बेस्ड’ सफाई प्रकल्पात ठेकेदार कंपनीचा हलगर्जीपणा उघडकीस आला आहे. दैनंदिन रस्ते सफाईचे काम करणार्‍या एल. व्ही. जी. फॅसिलिटीज इंडिया प्रा. लि. या कंपनीवर मनपाने तब्बल ६ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली.
 
पालिका हद्दीतील रस्ते सफाईची गुणवत्ता सुधारण्यासाठी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार वानवडी-रामटेकडी आणि बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील सफाईचे काम १ ऑगस्ट २०२६ पासून एल. व्ही. जी. फॅसिलिटीज कंपनीकडे सोपविण्यात आले.
 
दरम्यान, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकार्‍यांनी केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत सफाई व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले. वानवडी-रामटेकडी परिसरातील कोंढवा येथील गॅलेक्सी अपार्टमेंट, सनशाईन क्लासिक आणि ब्रह्मा अ‍ॅव्हेन्यू रोड परिसरात रस्त्यांवर झाडू मारण्यात आले नव्हते. ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग आणि कचरा साचणारे ठिकाणे आढळली. विशेष म्हणजे, या भागासाठी २७५ सफाई कर्मचार्‍यांना मंजुरी असतानाही पाहणीवेळी एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. त्यामुळे कंपनीला २ लाख ७५ हजार रुपयांचा दंड करण्यात आला.
 
बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील इंद्राणी रणदिवे रोड परिसरातही अशीच परिस्थिती आढळली. रस्त्यावर कचरा साचलेला असताना ३२५ मंजूर सफाई कर्मचार्‍यांपैकी एकही कर्मचारी कर्तव्यावर आढळला नाही. त्यामुळे कंपनीवर आणखी ३ लाख २५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.दोन्ही प्रकरणांत मिळून ६ लाख रुपयांचा दंड करण्यात आला असून, ही रक्कम ठेकेदार कंपनीकडून तातडीने वसूल करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.
 

Related Articles