अंगारकी चतुर्थीनिमित्त वाहतुकीत बदल   

पुणे : अंगारकी चतुर्थीनिमित्त मध्य भागातील वाहतूक व्यवस्थेत आज (मंगळवारी) बदल करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. या रस्त्याने स्वारगेटकडे जाणार्‍या वाहनांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
 
अंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे. 
 
टिळक रस्त्यावरील पूरम चौकातून बाजीराव रस्तामार्गे शिवाजीनगरकडे जाणार्‍या वाहनांनी टिळक रस्ता, अलका चित्रपटगृह, डेक्कन जिमखानामार्गे इच्छितस्थळी जावे. 
 
छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने स्वारगेटकडे जाणार्‍या वाहनांनी स. गो. बर्वे चौकातून (मॉडर्न कॅफे) जंगली महाराज रस्ता, झाशीची राणी चौक, खंडुजीबाबा चौक, टिळक रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे. अप्पा बळवंत चौकातून हुतात्मा चौकाकडे (बुधवार चौक) जाणारा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे, असे वाहतूक पोलिसांनी कळविले आहे.
 
वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि शक्यतो मध्यवर्ती भागातील अनावश्यक वाहनप्रवास टाळावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
 

Related Articles