शेअर बाजार कोसळला   

मुंबई : मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक सोमवारी घसरले. सेन्सेक्स १ हजार १२४ ने घसरुन ७२ हजार ७७२ तर निफ्टी ३६१ ने घसरुन २२ हजार ७८९ वर बंद झाला. गेल्या महिन्यात सेन्सेक्स आणि निफ्टी पाच टक्के घसरला असून, गुंतवणूकदारांचे १७.१७ लाख कोटींचे नुकसान झाले आहे. एकंदरीत, खनिज तेलाचे वाढलेले दर, भूराजकीय अनिश्चितता आणि अमेरिकन रोख्यांचे वाढलेले दर याचे परिणाम शेअर बाजारावर उमटले आहेत. दरम्यान, काल एका दिवसांत गुंतवणूकदारांनी ७.५२ लाख कोटी गमावले आहेत. 
 
गेल्या महिन्यात २७ ऑगस्टपासून ३० समभागांचा समावेश असलेला बीएसई सेन्सेक्स ४ हजार १६१.८७ ने म्हणजेच ५.४० टक्क्यानी घसरला. तसेच, ५० समभागांचा समावेश असलेला एनएसई निफ्टीही १ हजार ३१०.६ ने म्हणजेच ५.४४ टक्क्यांनी गडगडला. या काळात गुंतवणूकदारांचे १७.१७ लाख कोटींचे नुकसान झाले. 
 
दरम्यान, आंतरराष्ट्रीय खनिज तेल ब्रेंट क्रूडचे दर चार टक्क्यांनी वाढले असून एका पिंपाचा दर १०८.३ डॉलर्स  झाला. अमेरिका आणि इराणमधील वाढता तणाव पाहता खनिज तेलाचे दर वाढत चालले आहेत. 

सोने आणि चांदीचे दर घसरले

दिल्लीच्या सराफी बाजारात सोमवारी सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅममागे २ हजार ६०० रुपयांनी घसरून १ लाख ५० हजार झाला. याआधी, सोन्याचा दर १ लाख ५२ हजार ६०० रुपये प्रति १० ग्रॅम होता. चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली असून, शुक्रवारी सर्व करांसह दर प्रति किलो २.३७ लाख होता. तो आता पाच हजार रुपयांनी कमी होऊन २.३२ लाख प्रति किलो झाला आहे. 
 

Related Articles