यायचं असेल तर आमच्या पक्षात या; आम्ही कुणासोबत जाणार नाही!   

शरद पवार यांनी स्पष्ट केली विलीनीकरणाची अट

मुंबई,  (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसबाबत विविध प्रकारच्या चर्चा सुरू असतात. परंतु,  अशा कोणत्याही चर्चेला काही अर्थ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात भक्कमपणे काम करत असून ज्याला कोणाला यायचे आहे, त्यांनी आमच्यात यावे. आम्ही कुणासोबत नाही, अशा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी सोमवारी अजित पवार गटाला दिला. त्यामुळे दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांचे विलीनीकरण झालेच तर कोणाला कोणत्या गटात विलीन व्हावे लागेल, हे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. 
 
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक काल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पार पडली. या बैठकीत राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली. त्यावेळी पदाधिकार्‍यांशी संवाद साधताना पवार यांनी आपला पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट किंवा काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला. पक्षाबाबत अनेक चर्चा माध्यमांमध्ये रंगतात असतात. परंतु, अशा कोणत्याही चर्चेला काहीच अर्थ नाही.  मला चर्चा करणार्‍यांना सांगायचे आहे की  आपण कुठेही जाणार नाही.
 
राज्यात दुष्काळाची स्थिती आहे. दुष्काळाच्या स्थितीविषयी राज्य सरकारने काढलेल्या शासन  निर्णयात अनेक त्रुटी आहेत.  त्या त्रुटी दूर कराव्यात, यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. मला अपेक्षा आहे की, या पत्राचा विचार करून सरकार तातडीने राज्यातील दुष्काळग्रस्त लोकांना मदतीचा हात देईल. आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करायचे नाही. सरकारकडून दुष्काळग्रस्तांसाठी मदत मिळवायची आहे. ही मदत नाही मिळाली तर आंदोलनाचा मार्ग मोकळा आहे, असा इशारा पवार यांनी राज्य सरकारला दिला. तुम्ही थकबाकीदार असाल तर नवीन कर्ज तुम्हाला मिळणार नाही. याबाबत शेतकर्‍यांमधे जनजागृती होणे गरजेचे आहे. सरकारने २६५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत,  बाकी तालुके त्यात नाहीत. केळी पिकाला मदत नाही. याबाबत नोंद घेणे गरजेचे असल्याचे पवार यांनी सांगितले.
 
राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला  खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, विधिमंडळ गटनेते  जितेंद्र आव्हाड, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, निलेश लंके, भास्कर भगरे, आमदार रोहित पवार, माजी मंत्री अनिल देशमुख, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

कृत्रिम बुद्धिमत्ता समजून घ्या...

सध्याचा काळ कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता समजून घ्या. पक्षाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकार्‍यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रशिक्षण हवे असेल तर मोफत प्रशिक्षण दिले जाईल, त्याची सोय बारामती येथे केली जाईल. कृत्रिम बुद्धिमत्तेशिवाय येणारा काळ अडचणीचा आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर राजकारण, निवडणूक आणि पक्ष बांधण्यासाठी कसा करता येईल याचाही अभ्यास करा, अशी सूचनाही  त्यांनी  केली.
 

Related Articles