आयुक्त ज्ञानेश कुमार विरोधात काँग्रेस आक्रमक   

मुंबई, (प्रतिनिधी) : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. सोमवारी राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयांवर काँग्रेस पक्षाने मोर्चे काढून निषेध व्यक्त केला. अमरावती येथे ज्ञानेशकुमार यांच्या पुतळ्याची गाढवावरून धिंड काढण्यात आली. ठाण्यात ज्ञानेशकुमार यांच्या पुतळ्याला उठाबशा काढायला लावल्या. पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, नागपूरसह राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये निषेध मोर्चे काढण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन ज्ञानेशकुमार यांना सेवेतून तत्काळ बडतर्फ करून अटक करा, अशी मागणी करण्यात आली.
 
कोल्हापूर येथे विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गट नेते, माजी मंत्री आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली, सोलापुरात खासदार प्रणिती शिंदे, अमरावतीत माजी मंत्री यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखेडे, छत्रपती संभाजीनगर येथे खासदार डॉ. कल्याण काळे, चंद्रपूरमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर, नांदेड येथे खासदार रवींद्र चव्हाण, लातूरमध्ये डॉ. शिवाजी काळगे, ठाण्यात माजी खासदार कुमार केतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. 

दिल्लीसह देशभर निदर्शने

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत काँग्रेसने राजधानी दिल्लीसह देशभर जोरदार निदर्शने केली. दिल्लीत दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील पक्ष कार्यालयात दिल्ली काँग्रेसचे कार्यकर्ते जमले आणि त्यांनी ’निवडणूक भवन’कडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी बॅरिकेड्स लावून त्यांना अडवले. 
 
भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने मतचोरीमुळे आपली सत्ता टिकवून ठेवली असून,  ज्ञानेश कुमार यांनी यात मदत केली आहे, असा आरोप काँग्रेस नेत्या अलका लांबा यांनी केला.
कुमार यांना भारतरत्न द्या, अशी मागणी करणार्‍या भाजप नेत्यांवरही त्यांनी टीका केली. काही भाजप नेते कुमार यांना भारतरत्न मिळावा, अशी मागणी करत असून ही या किताबाची थट्टा आहे तसेच, आतापर्यंत हा सन्मान मिळालेल्या व्यक्तींचा अपमान आहे, असे लांबा म्हणाल्या. जोपर्यंत कुमार राजीनामा देत नाहीत, त्यांना पदावरून हटवले जात नाही आणि त्यांचे निर्णय रद्द केले जात नाहीत, तोपर्यंत काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन थांबणार नाही, असेही त्या म्हणाल्या. 
 

Related Articles