माण आणि खटाव तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा   

सातारा, (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यातील माण, खटाव आणि फलटण या तीन तालुक्यांतील ४२ गावे आणि २७५ वाड्यांमधील एकूण ६३ हजार ९९० लोकसंख्या टंचाईने बाधित झाली आहे. तसेच ५३ हजार ८०७ पशुधनही या टंचाईमुळे बाधित झाले आहे. या बाधित गावांना व वाड्यांना ३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
 
या परिस्थितीवर मात करण्यासाठी सध्या एकूण ३९ टँकर प्रत्यक्ष सुरू करण्यात आले असून, यामध्ये एक शासकीय आणि ३८ खासगी टँकरचा समावेश आहे. यात सर्वाधिक टंचाईची तीव्रता माण तालुक्यात दिसून येत आहे. माण तालुक्यातील ३५ गावे आणि २३९ वाड्यांतील ५६ हजार १५७ लोकसंख्येसाठी ३५ टँकर सुरू आहेत.  
 
खटाव तालुक्यात ७ गावे आणि ३६ वाड्यांतील ७ हजार ८३३ लोकसंख्येला ४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. फलटण तालुक्यात तीन गावे आणि चार वाड्यांतील २ हजार २२२ लोकसंख्या बाधित असून तेथे तीन टँकर मंजूर करण्यात आले आहेत. 
 
संपूर्ण जिल्ह्यात ८५.६० फेर्‍या मंजूर करण्यात आल्या होत्या, त्यापैकी दररोज ८१ फेर्‍या (९४.६३ टक्के) पूर्ण करून टंचाईग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. 
 

Related Articles