जरांगे यांच्या सहकार्‍याला कोट्यवधींचा दंड   

वाळू उपसा प्रकरणी 

जालना : मनोज जरांगे यांच्या सहकार्‍याला महसूल विभागाने मोठा दणका दिला आहे. गोदावरी नदी पात्रात दोन हजार ब्रास अवैध वाळू उत्खनन प्रकरणात कारवाई केली आहे. दंडात्मक कारवाईतून त्याला वगळणारा तत्कालीन तहसील दारांचा सुधारित आदेश अंबडच्या उपविभागीय अधिकार्‍यांनी रद्द केला आहे. महसूल आदेश रद्द केल्याने मनोज जरांगे यांच्या सहकार्‍याला धक्का बसल्याचे मानले जात आहे. 
 
आंबड तालुक्यातल्या साष्ट पिंपळगाव आणि डोमलगाव येथील गोदावरी नदीपात्रातील २०१२ मधील अवैध वाळू उत्खनन प्रकरणात  जरांगे यांचे विश्वासू सहकारी संजय नानासाहेब कटारे यांना ४ कोटी ९० लाख ७२ हजार दोनशे रुपयांचा दंडात्मक कारवाईतून वगळणारा तत्कालीन तहसील दाराचा सुधारित आदेश रद्द करण्यात आला आहे. अंबडचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी हा आदेश रद्द करत हा मोठा दणका दिला. त्यामुळे मूळ दंडात्मक आदेश पूर्ववत होऊन गट क्रमांक २६५ वर हा बोजा कायम असणार असल्याची माहिती समोर आली आहे.
 
स्वास्थ पिंपळगाव आणि डोमलगाव येथील गोदावरी नदीपात्रात दोन हजार  ब्रास अवैध वाळू उत्खनन झाल्या प्रकरणी २४ मार्च २०२३ रोजी तलाठी आणि मंडळ अधिकार्‍याच्या संयुक्त पथकाकडून पंचनामा करण्यात आला होता. त्या आधारित तत्कालीन तहसीलदारांनी १८ जणांवर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अंतर्गत ४ कोटी ९०  लाख ७२ हजार २०० रुपयांचा दंड ठोठावला होता. आता अंबडच्या उपविभागीय अधिकार्‍यांनी हा आदेश रद्द केला आहे. तीन वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या पंचनाम्यामध्ये १८ जणांच्या नावे ४ कोटी ९० लाख ७२ हजार दोनशे रुपयांचा सामूहिकरित्या व स्थावर मालमत्तेवर बोजा टाकण्यात आला होता. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मध्ये नियम ४८ कलम ७ व ८ अन्वये अवैध गौण खनिज उत्खनन व त्यावरील प्रतिबंधातात्मक दंडनीय वसुली करण्याचे आदेश दिले होते.

मंडप, व्यासपीठ काढल्याने संताप

अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण स्थळाचा मंडप आणि व्यासपीठ हटविण्यात आले. ग्रामस्थ व सरपंचांच्या निर्णयानंतर निर्णय घेतला आहे. गेल्या ३ वर्षांपासून येथूनच जरांगे यांचे मराठा आरक्षणाचे   उपोषण सुरू होते. अंतरवालीतील मंडप काढल्याबद्दल जरांगे यांनी खंत व्यक्त केली, मात्र आंदोलन थांबणार नसून ते अधिक व्यापक स्तरावर चालवले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.  सरकारने कितीही त्रास दिला तरी आपण मागे हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे.

Related Articles