साहिलकडून कॉपीबाबत खेद मैत्रिणीकडून पोलिसांना माहिती   

मुंबई : बॉम्बे आयआयटीचा विद्यार्थी साहील वाकोडे याने परीक्षेत कॉपी केल्याचा खेद आत्महत्या करण्यापूर्वी मैत्रिणीकडे व्यक्त केला होता, अशी माहिती पोलिसांच्या तपासात उघड होत आहे. १८ सप्टेंबर रोजी परीक्षेवेळी तो कॉपी करताना पकडला गेला होता. यानंतर त्याने आत्महत्या केली होती. 
 
साहील वाकोडे हा दुसर्‍या वर्षात शिकत होता. परीक्षेवेळी मोबाईलवर चॅटजिपीटीचा वापर करून प्रश्नांची उत्तरे शोधताना पकडला गेला होता. या नंतर  त्याने अनेक मित्रांना फोन केले होते. त्या नंतर त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत वसतिगृहाच्या खोलीत सापडला होता, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे विभागाने दिली. दरम्यान, या प्रकरणीं पोलिसांनी २५ जणांचे जबाब घेतले आहेत. त्यामध्ये प्राध्यापक, विद्यार्थी आणि वसतिगृहाचे कर्मचारी यांचा समावेश आहे. त्यामध्ये त्याच्या मित्रांचा समावेश आहे. त्यांनीच साहिलने फोन केल्याची माहिती दिली. त्यात त्याच्या एका मैत्रिणीने सांगितले की कॉपी केल्याबद्दल साहील याने खेद व्यक्त केला. थार्मोडायनामिक्स पेपरवेळी उत्तरे शोधण्याची मी चूक केली. तसेच परीक्षेवेळी केलेल्या गैरप्रकाराबाबत खंत व्यक्त केली होती. दरम्यान, अधिक तपशील प्राप्त करण्यासाठी साहिलचा मोबाईल तांत्रिक विश्लेषणासाठी पोलिसांनी कलिना न्याय वैद्यक प्रयोगशाळेत पाठवला आहे. तसेच गरज भासली तर आय फोन कंपनी अ‍ॅपलकडे तांत्रिक मदत प्राप्त करण्याचा प्रयत्नही केला जाणार आहे. व्हॉट्सअपचा तपशील प्राप्त करण्यासाठी कंपनीकडे संपर्क साधला जाणार आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज न्याय वैद्यक प्रयोगशाळेकडे छाननीसाठी पाठवले जाणार आहेत. 

वडिलांचे आझाद मैदानावर आंदोलन

 
साहिल वाकोडे याचे वडील रवींद्र वाकोडे यांनी मुलाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कारवाईच्या मागणीसाठी सोमवारी दक्षिण मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू केले. मुलाला न्याय मिळेपर्यंत आणि जबाबदार व्यक्तींना शिक्षा होईपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे. साहिलला जातीच्या भेदभावाचा सामना करावा लागला होता, असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. रवींद्र वाकोडे यांनी रविवारी सांगितले होते की, मला अटक झाली तरी त्याची पर्वा नाही. माझ्या मुलाला घटनात्मकरीत्या न्याय मिळालाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू आणि आंबेडकर यांचे राज्य आहे. न्याय मिळेपयर्र्ंत आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू ठेवणार आहे. 
 

Related Articles