लतादीदी यांचे संगीत क्षेत्रातील योगदान भावी पिढ्यांना प्रेरक   

भाजपकडून जयंतीदिनी आदरांजली 

नवी दिल्ली : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या विविध नेत्यांनी सोमवारी आदरांजली वाहिली. लता दीदी यांचे संगीत क्षेत्रातील योगदान भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील, अशा शब्दांत त्यांनी आदरांजली अर्पण केली. लतादीदींचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ मध्ये तर निधन ६ फेब्रुवारी २०२२ रोजी झाले होते. साधेपणा आणि सौम्यता याचे प्रतीक म्हणजे लतादीदी होत्या, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. 
 
लतादीदींच्या स्वरांमध्ये सहजता, स्थिरता आणि जिव्हाळ्याची एक खोल भावना होती, ज्याने प्रत्येक श्रोत्याला मंत्रमुग्ध केले. आपल्या आवाजाने अनेक भाषा आणि बोलीभाषांमधील संगीताला समृद्ध करणार्‍या लतादीदी, त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून देशवासीयांच्या हृदयात सदैव वास करतील, अशी पोस्ट शहा यांनी केली. भाजपचे अध्यक्ष नितीन नबीन, संरक्षण मंत्रीं राजनाथ सिंह, वाहतूक मंत्रीं नितीन गडकरी, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी लता मंगेशकर यांच्या संगीत क्षेत्रातील कार्याचा गौरव करताना आदरांजलीं अर्पण केली. 
 
‘स्वरसम्राज्ञी’ लता मंगेशकर यांचे भारतीय संगीत विश्वातील योगदान भावी पिढ्यांच्या कायम स्मरणात राहील, जयंतीनिमित्त भावपूर्ण अभिवादन करतो. दैवी गायन प्रतिभेने जगभरात त्यांनी देशाचे नाव उंचावले. केवळ सुमधुर आवाजासह देशाच्या समृद्धीशी संबंधित प्रत्येक उपक्रमाला त्यांनी सातत्याने प्रोत्साहनही दिले.
 
 - पंतप्रधान नरेंद्र मोदी
 

Related Articles