केतनला दरीत धक्का देताना पाहिले!   

साक्षीदाराचा दावा; चेतनकडून दरीत फेकण्याची धमकी 

पुणे : केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात सिया गोयल हिने केतनला लाथ मारल्यानंतर चेतन चौधरीने मागून जोरात धक्का दिल्याचे आपण पाहिले, असा दावा एका साक्षीदाराने पोलिसांना दिलेल्या जबाबात केल्याचे समोर आले आहे. या घटनेबाबत जाब विचारल्यानंतर ’गप्प राहा, तुलाही इथून खाली फेकतो’, अशी धमकी दिल्याचा दावाही या साक्षीदाराने केला आहे. त्यामुळे लोहगडच्या कड्यावर नेमके काय घडले, याचा तपास अधिक गंभीर टप्प्यावर पोहोचला आहे.
 
संबंधित साक्षीदार आपल्या मित्रांसोबत लोहगड किल्ल्यावर पर्यटनासाठी आला होता. किल्ल्यावर जात असताना त्याला केतन आणि सिया एकत्र दिसले. त्यांच्या मागे चेतन चौधरीही असल्याचे त्याने सांगितले आहे. विशेष म्हणजे, कडक उन्हाळा असतानाही चेतनने हुडी परिधान केली होती. त्यावर साक्षीदाराने त्याला प्रश्न केला होता. त्यामुळे चेतनचा चेहरा आपल्या लक्षात राहिल्याचे साक्षीदाराने पोलिसांना सांगितले.  किल्ल्यावर पुढे जात असताना साक्षीदाराच्या पोटात दुखू लागल्याने तो काही काळ आपल्या मित्रांपासून वेगळा झाला. त्यानंतर पुढे जात असताना त्याच्या नजरेस कथितरित्या ही घटना पडली.

केतनला जोरात धक्का दिल्याचा दावा 

साक्षीदाराच्या जबाबानुसार, लोहगडावर पोहोचल्यानंतर चेतन काही वेळ मंदिराजवळ बसला होता. त्यानंतर तो सिया आणि केतनच्या दिशेने गेला. याचदरम्यान साक्षीदाराने सियाने चेतनला इशारा केल्याचे पाहिले. त्यानंतर सिया खाली बसली आणि तिने केतनच्या पायावर लाथ मारल्याचे साक्षीदाराने सांगितले. त्याचवेळी चेतन मागून आला आणि त्याने केतनला जोरात धक्का दिल्याचा दावा जबाबात करण्यात आला आहे. हे दृश्य पाहिल्यानंतर साक्षीदाराने चेतनला जाब विचारला. मात्र, त्याला गप्प राहण्यास सांगत ’तुलाही इथून खाली फेकेन’, अशी धमकी दिल्याचे साक्षीदाराने पोलिसांना सांगितले आहे.

पाच दिवसांनी पोलिसांसमोर जबाब

या घटनेनंतर घरी परतल्यानंतर साक्षीदाराची तब्येत बिघडली. दरम्यान, केतनच्या मृत्यूची घटना माध्यमांमधून समोर आल्यानंतर त्याने पोलिसांशी संपर्क साधला. २३ जून रोजी त्याचा जबाब नोंदविण्यात आला. जबाबातील कथनाची पडताळणी करण्यासाठी पोलिसांकडून उपलब्ध डिजिटल आणि अन्य पुराव्यांची छाननी सुरू आहे.

दुसर्‍या साक्षीदारानेही सांगितले हुडीचे कनेक्शन

या प्रकरणात आणखी एका साक्षीदाराचा जबाब तपासाला जात आहे. महत्त्वाचा लोहगड किल्ल्यावर चढताना या साक्षीदाराची चेतनसोबत भेट झाली होती. कडाक्याच्या उष्णतेत हुडी घातल्याने त्याने चेतनला त्याबाबत प्रश्न केला. त्यावर चेतनने माफी मागितली आणि तेथून पुढे गेल्याचे या साक्षीदाराने सांगितले आहे.या दोन्ही साक्षीदारांच्या जबाबांमधील साम्यस्थळे आणि विरोधाभास यांची तपास यंत्रणेकडून पडताळणी केली जात आहे.

१२ टीबी डिजिटल डेटा तपासाच्या केंद्रस्थानी

केतन प्रकरणातील तपास केवळ प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांपुरता मर्यादित राहिलेला नसून डिजिटल पुराव्यांचीही छाननी सुरू आहे. पोलिसांकडून तब्बल १२ टीबी डिजिटल डेटाची पडताळणी केली जात आहे. यामध्ये ६ मोबाइल, ९ पेन ड्राईव्ह, विविध बॅकअप, कॉल रेकॉर्ड, समाज माध्यम अकाउंट्स आणि डिलिट करण्यात आलेल्या चॅटचा समावेश आहे. फॉरेन्सिक तपासात हटविलेली काही माहितीही रिकव्हर झाल्याचे तपासातून समोर आले आहे.

Related Articles