स्टोन क्रशरमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू   

मालकासह तिघांविरूध्द गुन्हा 

पुणे : लोणीकंद परिसरात स्टोन क्रशरच्या यंत्रामध्ये अडकून एका १७ वर्षाच्या कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलाला कामावर ठेवून त्याच्याकडून धोकादायक पद्धतीने काम करून घेणे, तसेच त्याला आवश्यक सुरक्षाविषयक साधने उपलब्ध करून न दिल्याचा ठपका ठेवत लोणीकंद पोलिसांनी स्टोन क्रशर मालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 
प्रिन्स विजयसिंग धुर्वे (वय १७) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत साईराम स्टोन क्रशरचे मालक दिलीप संभाजी शिळीमकर (वय ४०, रा. साईसमृद्धी अपार्टमेंट, वाघोली, अहिल्यानगर रस्ता), सत्यजीत अशोक जाना (वय ३५, रा. स्पंदन स्पर्श सोसायटी, वाघोली, अहिल्यानगर रस्ता) आणि अमित भगवान अकोलकर (रा. व्हिजन प्रिसा अपार्टमेंट, रावेत, पिंपरी-चिंचवड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस हवालदार अजित कुर्‍हे यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
 
लोणीकंद परिसरात साईराम स्टोन क्रशर असून, प्रिन्स धुर्वे तेथे काम करीत होता. धुर्वे हा अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही त्याच्याकडून स्टोन क्रशरसारख्या धोकादायक यंत्रसामग्रीच्या ठिकाणी काम करून घेतले जात होते. 
 
१२ सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास स्टोन क्रशर यंत्रामध्ये अडकून धुर्वे गंभीर जखमी झाला. अपघातानंतर त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाकडून या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
 
लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. प्राथमिक चौकशीत स्टोन क्रशरवर काम करणार्‍या अल्पवयीन धुर्वे याला आवश्यक सुरक्षाविषयक साधने उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तसेच, त्याच्याकडून धोकादायक स्वरूपाचे काम करून घेतले जात असल्याचेही तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 
या प्रकरणात अल्पवयीन कामगाराच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यानेच दुर्घटना घडली का, यासह स्टोन क्रशरवरील कामकाजाची पद्धत, सुरक्षाव्यवस्था आणि संबंधितांची जबाबदारी याबाबत पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे. पुढील तपास पोलिस हवालदार जगताप करीत आहेत.

Related Articles