सोलापूरमध्ये आता पाच दिवसाआड पाणी   

दोन मुख्य जलवाहिन्या नादुरुस्त ; दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक एक दिवसाने पुढे जाणार

सोलापूर : सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन महत्त्वाच्या मुख्य जलवाहिन्या नादुरुस्त झाल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम होणार आहे. या दोन्ही जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम सोमवार, २८ सप्टेंबरपासून सोलापूर महानगरपालिकेने हाती घेतले आहे. दुरुस्तीला बराच कालावधी लागणार असल्याने मंगळवार, २९ सप्टेंबरपासून शहरातील चार दिवसांआडचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलला जाणार असून, एका फेरीसाठी पाच दिवसांचे अंतर राहणार आहे.
 
सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्र परिसरात सोरेगाव ते जुळे सोलापूर दरम्यानची १२०० मिमी व्यासाची मुख्य पंपिंग जलवाहिनी नादुरुस्त झाली आहे. त्याचबरोबर जामगुंडे मंगल कार्यालयाच्या पाठीमागे रेल्वे ट्रॅकजवळ ७६२ मिमी व्यासाची मुख्य पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी नादुरुस्त झाली आहे.
 
या दोन्ही ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून, त्याचा परिणाम उजनी जलवाहिनीवरील पाणीपुरवठ्यासह भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्र आणि सिव्हिल हॉस्पिटलजवळील उच्चस्तरीय पाण्याच्या टाकीवर अवलंबून असलेल्या भागांवर होणार आहे.महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयाने नागरिकांना उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles