बँकॉकमध्ये पुराचे थैमान; ५० जिल्हे आपत्तीग्रस्त घोषित   

बँकॉक : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले  आहे. शहरातील अनेक प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले असून, वाहने बुडाली आहेत. काही ठिकाणी बसमध्येही पाणी शिरले आहे. अनेक भागांमध्ये नागरिकांना कमरेपर्यंत साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे.
 
बँकॉकमधील सर्व ५० जिल्हे आपत्तीग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. काही भागांत रविवारपर्यंतच्या ४८ तासांत ३०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हवामान विभागाने २७ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असून त्यामुळे पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
 
दरम्यान, पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी थायलंडचे पंतप्रधान अनुटिन चार्नविराकुल यांनी लंडनचा दौरा अर्धवट सोडून बँकॉकला परतण्याचा निर्णय घेतला. प्रशासनाने पूरग्रस्त नागरिकांसाठी २३३ तात्पुरती मदत शिबीरे उभारली असून, ४ हजार २०० नागरिकांनी या शिबिरांमध्ये आश्रय घेतला आहे. परिस्थिती लक्षात घेऊन काही भागांतील शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.

सरासरीपेक्षा अधिक पाऊस

एक ते २५ सप्टेंबरदरम्यान बँकॉक शहरात ४८७ मिलिमीटर पाऊस झाला. १९९१ ते २०२० या कालावधीतील याच दिवसांमधील सरासरी पाऊस सुमारे २६९ मिमी होता. त्यामुळे यंदा सप्टेंबरमधील पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा लक्षणीय अधिक आहे. बँकॉकमध्ये सप्टेंबर हा पावसाचा प्रमुख काळ असला तरी यंदाची पूरस्थिती नेहमीपेक्षा गंभीर आहे. 

२१ प्रांतांमध्ये पूरसदृश परिस्थिती

बँकॉकबरोबरच थायलंडमधील २१ प्रांतांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. आपत्ती प्रतिबंध आणि मदत विभागाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. देशाच्या बहुतांश भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, काही भागांत पावसाचा जोर कमी झाल्याने प्रशासनाने पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरू केले आहे. पुढील काही तासांत पाऊस कमी राहिल्यास पाण्याची पातळी हळूहळू कमी होण्याची शक्यता अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.
 

Related Articles