कांगोत बोट उलटली; १२ जणांचा मृत्यू   

किंशासा : कांगोमधील किवु सरोवरात शनिवारी रात्री प्रवासी बोट उलटली. या दुर्घटनेत आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण बेपत्ता आहेत. ही दुर्घटना दक्षिण किवु प्रांतातील किसेके गावाजवळ घडली. दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. आतापर्यंत सुमारे १५ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. दुर्घटनेच्या वेळी नावेत ५० हून अधिक व्यापारी आणि प्रवासी असल्याचे सांगण्यात आले आहे. 
 
बोट नेमकी कोणत्या कारणामुळे उलटली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यासाठी सरोवरात बचाव आणि शोधमोहीम सुरू आहे. त्यामुळे मृतांचा आणि बेपत्ता व्यक्तींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.  
 
किवु सरोवर हे डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि रवांडा यांच्या सीमेवर असलेले महत्त्वाचे जलक्षेत्र आहे. कांगोतील अनेक भागांमध्ये रस्ते वाहतूक मर्यादित असल्याने स्थानिक नागरिक आणि व्यापारी मोठ्या प्रमाणावर जलवाहतुकीवर अवलंबून असतात. त्यामुळे नावांमधून मोठ्या संख्येने प्रवासी आणि मालाची वाहतूक केली जाते.
 
दरम्यान, किवु सरोवरात यापूर्वीही जीवघेण्या नाव दुर्घटना घडल्या आहेत. ऑक्टोबर २०२४ मध्ये याच सरोवरात नाव उलटून, मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली होती. कांगोमध्ये नदी आणि सरोवरातील जलवाहतुकीदरम्यान क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेणे, बोटींची खराब अवस्था आणि सुरक्षा साधनांची कमतरता यामुळे अपघातांचा धोका वाढत आहे.
 

Related Articles