दहशतवादाचे धोरण सोडावे; अन्यथा कठोर कारवाई करु   

राजनाथ यांचा पाकिस्तानला इशारा 

नवी दिल्ली : पाकिस्तानने दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचे धोरण सुरूच ठेवले, तर भारत दहशतवादाविरोधात आवश्यक ती कोणतीही कारवाई करण्यास तयार आहे, असा स्पष्ट संदेश संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिला. राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नावर भारत कोणतीही तडजोड करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
‘एनडीटीव्ही डिफेन्स समिट २०२६’मध्ये राजनाथ  बोलत होते. ते म्हणाले, भारताला कोणत्याही देशाच्या भूभागावर कब्जा करण्याची इच्छा नाही. मात्र, राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाल्यास भारत आपल्या हितांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक पावले उचलेल, भारताला इतर देशांसोबत संरक्षण क्षेत्रात सहकार्य हवे आहे; मात्र त्यासाठी देशाच्या राष्ट्रीय हिताची किंवा धोरणात्मक स्वायत्ततेची किंमत मोजली जाणार नाही, दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी सुरू राहू शकत नाहीत,  दहशतवादाला पाठिंबा देणार्‍या शक्तींविरोधात भारताची भूमिका कठोर राहील, असे संकेत त्यांनी दिले.
 
दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्र महासभेतील भाषणात सिंधू नदीच्या पाण्याचा मुद्दा उपस्थित केला. भारताने पाकिस्तानच्या वाट्याचे पाणी वळवण्याचा प्रयत्न केल्यास त्याला युद्धाची कृती मानले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. त्यांनी काश्मीरचाही मुद्दा उपस्थित केला. भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. दहशतवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेच्य विषयावरर भारताची भूमिका स्पष्ट असल्याचे या वक्तव्यातून पुन्हा अधोरेखित झाले.
 

Related Articles