केरळम सरकारची वेबसाइट हॅक   

पाकिस्तानी हॅकर्सवर संशय 

तिरुवनंतपुरम : केरळम सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाची अधिकृत वेबसाइट रविवारी एका संशयित पाकिस्तानी गटाने हॅक केल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली. वेबसाइट सकाळी हॅक करण्यात आली आणि त्यावर पाकिस्तानचा ध्वज लावण्यात आला होता.
 
’टीम ब्लॅकलीट्स’ या गटाने ही वेबसाइट हॅक केल्याचा दावा करणारा संदेश आणि पाकिस्तानच्या समर्थनार्थ एक घोषणाही त्यावर पोस्ट करण्यात आली होती. आम्ही पाकिस्तानी हॅकर्स आहोत. दररोज अनेक वेबसाइट्स हॅक केल्या जातात; आज तुमचा दिवस आहे, असा संदेश त्यात होता. यानंतर  होस्टिंग प्रोव्हायडरने संबंधित खाते तात्पुरते बंद केले, असे अधिकार्‍यांनी सांगितले. माहितीची चोरी (डेटा ब्रीच) झाली आहे का ? याची तपासणी सायबर पथक करत आहे आणि वेबसाइट सुरक्षित झाल्यानंतर ती पुन्हा कार्यान्वित केली जाईल, असे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. 
 
विभाग या प्रकरणाची माहिती तपासासाठी सायबर पोलिसांना देणार असून लवकरच याबाबत तक्रारही दाखल केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. केरळ सरकारची महत्त्वाची संकेतस्थळे आणि ई-गव्हर्नन्स कार्यक्रम ’केरळम स्टेट आयटी मिशन’द्वारे चालवले जातात.
 

Related Articles