केदारनाथ मार्गावर दरड कोसळली; चार हजार भाविक अडकले   

डेहराडून : उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात केदारनाथ यात्रेच्या मार्गावर दरड कोसळल्याने सुमारे चार हजार भाविक अडकले आहेत. डोंगरावरून सातत्याने दगड आणि राडारोडा कोसळत असल्याने मार्ग मोकळा करण्याच्या कामात अडथळे येत आहेत. खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर केदारनाथ यात्रा स्थगित करण्यात आली असून हेलिकॉप्टर सेवाही बंद ठेवण्यात आली आहे.  
 
रुद्रप्रयागमधील सिरोबगड परिसरातही दरड आणि राडारोडा रस्त्यावर आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेची पथके राडारोडा हटविण्याचे काम करीत आहेत. मात्र, डोंगरावरून पुन्हा दगड-माती कोसळण्याचा धोका असल्याने हे काम आव्हानात्मक ठरत आहे. अलकनंदा आणि मंदाकिनी नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली असून, नदीकाठच्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  
 
दरम्यान, हवामान विभागाने उत्तराखंडमधील डेहराडून, टिहरी, हरिद्वार आणि पौरी या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. उत्तरकाशी, चमोली, नैनीताल आणि रुद्रप्रयाग येथे ऑरेंज अलर्ट, तर बागेश्वर, अल्मोडा, चंपावत, उधमसिंगनगर आणि पिथोरागढ येथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे दरडी कोसळणे आणि अचानक पूर येण्याचा धोका कायम आहे.चारधाम यात्रेबाबत प्रशासनाने यापूर्वीच हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन २६ आणि २७ सप्टेंबर रोजी यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. यात्रेकरूंच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला आहे.
 

Related Articles