ज्ञानेश कुमार यांना लक्ष्य करुन असंतोष पसरविण्याचा प्रयत्न   

राहुल यांच्यावर फडणवीस यांची टीका

नागपूर :  निवडणूक आयोग आणि  मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना लक्ष्य करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा मतचोरीच्या आरोप चुकीचा असून या प्रश्नांचे भांडवल करुन ते समाजात अकारण असंतोष निर्माण करत आहेत, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केला.  
 
बेछूट आरोप करुन निवडणूक आयोगाची जनमानसातील विश्वासहर्ता धोक्यात आणण्याचे प्रयत्न राहुल यांच्याकडून केले जात असल्याचे सांगताना फडणवीस म्हणाले, एसआयआर राबविताना घेतलेले निर्णय एकमुखाने घेतल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे निवडणूक आयुक्तांमध्ये मतभेद असल्याचे वृत्त चुकीचे आहे. 
 
मते चोरल्याचे दावे फेटाळून लावताना फडणवीस म्हणाले, मला अगदी स्पष्ट शब्दांत सांगायचे आहे की, कोणतीही मते चोरली गेली नाहीत. राहुल यांची बुद्धीच चोरली गेली आहे. त्या चोरल्या गेलेल्या बुद्धीबाबत मी पंतप्रधानांना विनंती करेन की, त्यांनी एक समिती स्थापन करावी जी त्यांची बुद्धी परत आणेल, जेणेकरून ते देशाच्या हितासाठी बोलतील.
 
दरम्यान, एका वृत्तात असा दावा करण्यात आला आहे की, ’एसआयआर’ प्रक्रियेच्या हाताळणीबाबत दोन निवडणूक आयुक्तांनी दहा महिन्यांच्या कालावधीत किमान १४ वेळा अधिकृतपणे आक्षेप नोंदवले होते; या पार्श्वभूमीवर काँग्रेस तसेच इतर अनेक पक्ष आणि संघटनांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
 

Related Articles