शक्तिपीठ रस्त्यासाठी खर्च होणारा पैसा शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करा : सुळे   

पंढरपूर तहसील कार्यालयावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा मोर्चा

पंढरपूर, (वार्ताहर) : शक्तीपीठासाठी ८० हजार कोटी देता मग शेतकर्‍यांना  नुकसान भरपाई का देत नाही. शक्तीपीठ दोन वर्ष पुढे ढकला. शेतकर्‍यांना शक्तीपीठाची नव्हे तर सरसकट कर्जमाफीची गरज आहे, त्यामुळे सरसकट कर्जमाफी करा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
 
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पंढरपूर तहसील कार्यालयावर शेतकर्‍यांच्या न्याय मागणीसाठी धडक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार राजू खरे, आमदार नारायण आबा पाटील, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख, महेश गादेकर, नागेश फाटे, दिपक वाडदेकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी सुळे बोलत होत्या.  या प्रसंगी पंढरपूर प्रांताधिकारी सचिन इथापे यांना निवेदन देण्यात आले.
 
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शेतकर्‍यांना शक्तीपीठाची नव्हे तर सरसकट कर्जमाफीची गरज असून, राज्यात प्रचंड मोठा दुष्काळ आहे. शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे सरकारकडून शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी होईल, अशी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. पंचनामे तातडीने पूर्ण करुन शेतकर्‍यांना आर्थिक दिलासा द्यावा. शक्तीपीठ मार्गासाठी १ लाख कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. हा महामार्ग कोणी मागत नाहीत, जे पैसे शक्तिपीठ रस्त्यासाठी खर्चणार आहात ते सर्व पैसे कर्जमाफीसाठी द्या, शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करा, सगळी जनता दुष्काळात होरपळत असताना मंत्री काजू बदाम खात असतील तर अशा असंवेदनशील मंत्र्यांना अडवून जेलमध्ये टाकलेले चांगले. राज्य सरकारने सर्व ४८ खासदारांना एकत्र बोलवावे, आम्ही सरकारसोबत दिल्लीत जाऊ आणि राज्यातील जनतेसाठी सरकारकडे हात जोडू, पुढे दुष्काळासाठी काय करता येईल, यावर विचार करू, सरकारने चांगल्या दुष्काळी योजना आणल्या तर आम्ही सरकारला सहकार्य करू, अशी ग्वाही सुळे यांनी दिली.
 

Related Articles