पाण्याअभावी दोन एकर केळीच्या बागेवर फिरवला ट्रॅक्टर   

भूम (वार्ताहर) : दुष्काळी परिस्थितीचा मोठा फटका शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांना बसत असून, पाण्याअभावी तालुक्यातील वारेवडगाव येथील शेतकरी विनोद लाडाणे यांनी २ एकर क्षेत्रातील केळीची बाग नाईलाजाने ट्रॅक्टर फिरवून मोडीत काढली. हिरवीगार बाग डोळ्यांसमोर उद्ध्वस्त होताना पाहण्याची वेळ आल्याने लाडाणे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
 
लाडाणे यांनी २ एकर क्षेत्रात केळीची लागवड करून खत, औषधे, मजुरी आणि पाण्यासाठी मोठा खर्च केला होता. मात्र यंदा पावसाने पाठ फिरवल्याने परिसरात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली. उपलब्ध पाणीसाठा कमी झाल्याने बागेला आवश्यक पाणी देणे शक्य झाले नाही. परिणामी झाडांची वाढ खुंटली आणि उत्पादनापूर्वीच पीक वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली.
 
अखेर वाढता खर्च आणि पुढील नुकसान टाळण्यासाठी त्यांनी बाग मोडीत काढली. प्रशासनाने तातडीने पाहणी करून पंचनामा करावा व शासनाच्या निकषानुसार नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी लाडाणे यांनी केली आहे.

Related Articles