दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी; भोजनगृहाची दरवाढही मागे   

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचा विद्यार्थी हिताचा निर्णय

पुणे : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिलासा देणारे निर्णय घेतले आहेत. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त तालुक्यांतून येणार्‍या विद्यार्थ्यांचे आगामी परीक्षांचे शुल्क माफ करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच विद्यापीठाच्या भोजनगृहातील प्रस्तावित दहा रुपयांची दरवाढही रद्द करण्यात आली आहे. कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी ही माहिती दिली.
 
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत विद्यार्थ्यांशी संबंधित विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये दुष्काळामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणार्‍या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. राज्य शासनाच्या धोरणानुसार दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना आगामी परीक्षेसाठी शुल्कमाफी देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
 
दरम्यान, विद्यापीठाच्या भोजनगृहातील जेवणाच्या दरात दहा रुपयांची वाढ करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. गेल्या काही वर्षांत भोजनाच्या दरात वाढ झालेली नसल्याने वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, विद्यार्थ्यांकडून या दरवाढीला विरोध करण्यात आला होता. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन दरवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर व्यवस्थापन परिषदेने प्रस्तावित दरवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला.
 
भोजनगृहातील जेवणाची गुणवत्ता कायम ठेवतानाच गरजू विद्यार्थ्यांना परवडणार्‍या दरात भोजन उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत प्रा. संगीता जगताप यांचा समावेश आहे. भोजनगृहाच्या व्यवस्थापन आणि गुणवत्तेशी संबंधित उपाययोजनांचा समिती अभ्यास करणार आहे.
 
विद्यापीठातील भोजनगृहाच्या गुणवत्ता नियंत्रणासह विविध विषयांसाठी कार्यरत असलेल्या समित्यांची पुनर्रचना करण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला. या समित्यांची कार्यकक्षा, जबाबदार्‍या आणि कामकाजासाठी आवश्यक निकष निश्चित करण्याचे काम डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांच्या अध्यक्षतेखालील समिती करणार आहे. त्यामुळे भोजनगृहाच्या व्यवस्थापनात अधिक सुसूत्रता आणण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे.

Related Articles