टिळक चौकात गणेश मंडळाची पोलिसांशी हुज्जत   

कारवाईच्या इशार्‍याचीच उडवली खिल्ली? 

पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि ध्वनिक्षेपकांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याचा दावा केला असतानाच टिळक चौकात पोलिसांच्या सूचनांनाच एका गणेश मंडळाने थेट आव्हान दिल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘आमचा स्पीकर बंद करताय तर आधी सगळ्यांचे स्पीकर बंद करा,’ अशी भूमिका घेत मंडळाच्या पदाधिकार्‍याने पोलिसांशी हुज्जत घातल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहे. पोलिसांच्या उपस्थितीतच मंडळाने पुन्हा मोठ्या आवाजात डीजे सुरू केल्याचे चित्रफितीमध्ये दिसत असल्याने पोलिसांच्या ध्वनीनियंत्रण मोहिमेच्या अंमलबजावणीवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 
अनंत चतुर्दशीच्या दिवशी पारंपरिक विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता आणि केळकर रस्त्यावरून गणेश मंडळे टिळक चौकाच्या दिशेने येत होती. याचवेळी टिळक चौकात डीजेवर निर्बंध असतानाही एका मंडळाने मोठ्या स्पीकरसह प्रवेश केल्याचे समोर आले. 
 
पोलिसांनी संबंधित मंडळाला स्पीकर बंद करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्याऐवजी मंडळाच्या पदाधिकार्‍याने माईकवरूनच पोलिसांच्या कारवाईला आक्षेप घेतला. ‘आमचा स्पीकर बंद करताय, तर आधी सगळ्यांचे स्पीकर बंद करा,’ अशी भूमिका मांडत त्याने पोलिसांशी वाद घातल्याचे चित्रफितीमध्ये दिसत आहे. त्यानंतर मंडळाने डीजे पुन्हा सुरू केल्याचेही समोर आले.

पोलिसांसमोरच ‘दादागिरी’ ; कारवाई कुठे?

विशेष म्हणजे, हा प्रकार घडत असताना वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी उपस्थित असल्याचे चित्रफितीमध्ये दिसत आहे. एवढेच नव्हे, तर डीजेच्या कर्णकर्कश आवाजापासून बचाव करण्यासाठी एका पोलिस अधिकार्‍याने कानावर साऊंडप्रूफ हेडफोन लावल्याचे दृश्यही प्रसारित झाले आहे. त्यामुळे एकीकडे ‘ध्वनीमर्यादा ओलांडली तर गुन्हा दाखल करू, ध्वनियंत्रणा जप्त करू’ असा पोलिसांचा इशारा आणि दुसरीकडे पोलिसांच्या उपस्थितीतच नियमांना आव्हान देणार्‍या मंडळाचा प्रकार, या दोन्ही घटनांमध्ये नेमका फरक किती, असा सवाल उपस्थित होत आहे. 
 
विसर्जन मिरवणुकीपूर्वी पोलिस आयुक्तांनी ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करणार्‍या गणेश मंडळे आणि ढोल-ताशा पथकांवर कारवाईचा इशारा दिला होता. तसेच मंडळांना जास्तीत जास्त चार टॉप आणि चार बास स्पीकर वापरण्याची परवानगी असल्याचे सांगण्यात आले होते. निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक ध्वनियंत्रणा आढळल्यास संपूर्ण साउंड सिस्टीम जप्त करण्याची भूमिकाही पोलिसांनी जाहीर केली होती.

इशारे, बैठका आणि नियोजन, तरीही आवाजाचा दणदणाट

ध्वनीप्रदूषणाच्या प्रश्नावर विसर्जन मिरवणुकीपूर्वी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली होती. डीजेच्या वाढत्या आवाजाविरोधात पुण्यात आंदोलनही झाले होते. मात्र प्रत्यक्ष विसर्जन मिरवणुकीत ध्वनीप्रदूषणाची स्थिती आणखी गंभीर झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या ध्वनीनिरीक्षणानुसार, लक्ष्मी रस्त्यावरील दहा प्रमुख चौकांमध्ये यंदा सरासरी १०४.५ डेसिबल ध्वनीपातळीची नोंद झाली. 
 
२०२५ मध्ये ही सरासरी ९२.६ डेसिबल होती. म्हणजेच, यंदा सरासरी पातळीत सुमारे ११.९ डेसिबलची वाढ झाली आहे. दुपारी चार वाजता दहा चौकांची सरासरी ध्वनीपातळी ११३.४ डेसिबल, रात्री आठ वाजता १११.९ डेसिबल, तर मध्यरात्री बारा वाजता तब्बल ११२.६ डेसिबल नोंदली गेली. काही ठिकाणी ११५ डेसिबलपेक्षाही अधिक ध्वनीपातळीची नोंद झाली.

बंद डीजे भूमिकेने पोलिसांची कोंडी?

टिळक चौकातील प्रकारामुळे आता आणखी एक प्रश्न पुढे आला आहे. नियम सर्वांसाठी समान असतील तर त्यांची अंमलबजावणीही सर्वांवर समान झाली का? एखाद्या मंडळाला स्पीकर बंद करण्याची सूचना देण्यात आल्यानंतर पदाधिकारी पोलिसांशी हुज्जत घालत असेल आणि त्यानंतरही ध्वनिक्षेपक सुरू राहत असेल, तर पोलिसांनी त्यावर कोणती कारवाई केली, हा तपासाचा मुद्दा ठरतो. प्रसारित चित्रफितीच्या आधारे पोलिस प्रशासन या प्रकाराची चौकशी करणार का? संबंधित मंडळावर गुन्हा दाखल होणार का? आणि ध्वनियंत्रणा जप्त करण्यात आली का? याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

Related Articles