भारताचा सिंगापूरवर ७-० ने विजयभारताचा सिंगापूरवर ७-० ने विजय   

आइची-नागोया : भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेतील साखळी फेरी अपराजित राहत पूर्ण केली. पूल ‘ब’मधील अखेरच्या सामन्यात भारताने सिंगापूरचा ७-० असा धुव्वा उडवत सलग पाचवा विजय मिळवला आणि गटात अव्वल स्थान पटकावले.
 
कर्णधार सलीमा टेटे, सुनेलिता टोप्पो, लालरेमसियामी, रुतुजा दादासो पिसल, निकी प्रधान आणि दीपिका यांनी भारतासाठी गोल केले. सुनेलिताने दोन गोल नोंदवले. सलीमाने १७व्या मिनिटाला खाते उघडले. त्यानंतर सुनेलिताने २२व्या व २४व्या मिनिटाला गोल करत आघाडी ३-० अशी केली. लालरेमसियामीने २६व्या, तर रुतुजाने २९व्या मिनिटाला गोल केला. तिसर्‍या सत्रात निकी प्रधानने ३५व्या मिनिटाला सहावा गोल केला. सामना संपण्याच्या पाच मिनिटे आधी दीपिकाने पेनल्टी कॉर्नरवर शानदार फ्लिक करत सातवा गोल केला.

पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयश

भारताने संपूर्ण सामन्यात वर्चस्व राखले; मात्र सिंगापूरच्या बचावफळीने सुरुवातीला भारतीय आक्रमणे रोखली. पहिल्या दोन सत्रांत भारताला १५ पेनल्टी कॉर्नर मिळाले, त्यापैकी केवळ तीनचे गोलमध्ये रूपांतर करता आले. तिसर्‍या सत्रापर्यंत भारताला एकूण २४ पेनल्टी कॉर्नर मिळाले होते, मात्र तीनच गोल नोंदवता आले. पाच सामन्यांत पाच विजयांसह भारताने पूल ‘ब’मध्ये अव्वल स्थान मिळवले. आता ३० सप्टेंबरला उपांत्य फेरीत भारताची गाठ कोरियाशी पडणार आहे. दुसर्‍या उपांत्य सामन्यात विद्यमान विजेता आणि ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता चीन यांचा सामना यजमान जपानशी होईल. 
 

Related Articles