अनाहत, अभय यांचे सुवर्ण हुकले   

मलेशियन प्रतिस्पर्ध्यांकडून पराभव; रौप्यपदकावर समाधान

नागोया : भारतीय स्क्वॅशपटू अनाहत सिंग आणि अभय सिंग यांना रविवारी येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आपापल्या मलेशियन प्रतिस्पर्ध्यांकडून पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
 
अभयला पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात ईन यो एनजीविरुद्ध कडवी झुंज देता आली नाही. त्याला ९-११, ५-११, ५-११ असा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. १८ वर्षीय अनाहतलाही महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात मलेशियाच्या शिवसांगरी सुब्रमण्यम हिने सहज पराभूत केले. जागतिक क्रमवारीत १७व्या स्थानावर असलेल्या अनाहतला पाचव्या क्रमांकाच्या शिवसांगरीकडून ४-११, ४-११, ७-११ असा पराभव स्वीकारावा लागला. यो आणि शिवसांगरी या दोघांनी २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करणार्‍या स्क्वॅश स्पर्धेसाठी पात्र ठरणारे पहिले दोन खेळाडू ठरत इतिहास रचला. दोघांनीही आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपापल्या सुवर्णपदकाचा यशस्वी बचाव केला. 

चिनप्पा-सेंथिलकुमार जोडीला कांस्यपदकावर समाधान

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताच्या जोशना चिनप्पा आणि वेलवन सेंथिलकुमार यांच्या मिश्र दुहेरी जोडीने स्क्वॅशमध्ये कांस्यपदक पटकावले. मात्र, उपांत्य फेरीत हाँगकाँग, चीनच्या ली का यी आणि तांग मिंग होंग यांच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागल्याने भारतीय जोडीचे अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले. उपांत्य फेरीच्या चुरशीच्या लढतीत चिनप्पा-सेंथिलकुमार जोडीला १-२ (१०-११, ११-२, १०-११) असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारतीय जोडीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
 

Related Articles