E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
नवरात्री
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
सायुज्यमुक्तीसाठी रावणाने निवडला मार्ग
Samruddhi Dhayagude
28 Sep 2026
भावार्थ रामायणातील कथा :विलास सूर्यकांत अत्रे मो. नं. ९८५०९७८४५०
धर्म ऋषींनी रावण आणि नारदमुनी यांच्या भेटीची कथा मंदोदरीला सांगण्यास सुरुवात केली. ’विष्णूंशी युद्ध करताना रावणाला मृत्यू येईल आणि तो मोक्षपदाला जाईल, त्याला सायुज्यमुक्ती मिळेल’, असे सनत्कुमारांनी रावणाला सांगितले होते. त्यानंतर रावण ब्रह्मदेवांना भेटण्यासाठी गेला. विष्णूशी युद्ध करण्यासाठी रावण उतावीळ झाला होता. ती वेळ कधी येईल, तो अनादी, अनंत विष्णू कसा युद्धाला येईल, ते युद्ध कसे असेल याचे रावणाला वेध लागले होते. याच विचारात ब्रह्मसदनाहून ब्रह्मदेवांचे दर्शन घेऊन रावण परत येत असताना वाटेत त्याला नारदमुनी भेटले.
नारदमुनी दिसताच रावणाला अत्यानंद झाला. नारदमुनींमुळे आपले मनोरथ पूर्ण होतील, आपण कृतकृत्य होऊ, आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडून मिळतील असे त्याला वाटले. त्याने नारदमुनींना नमस्कार केला आणि त्यांना प्रश्न विचारला की, ’तुम्ही सर्वश्रेष्ठ नारायणाचे भक्त आहात. तीनही लोकांत तुमचा अविरत संचार असतो. तीनही लोकांची साद्यंत माहिती तुम्हाला असते. मुनीवर तुम्हाला तीनही लोकांतील परिस्थिती माहिती असते. म्हणून मला तुमच्याकडून काही माहिती हवी आहे. ती तुमच्या मुखातून समजावी अशी माझी विनवणी आहे.’ नारदमुनींची आपल्या विनवणीला संमतीच आहे असे समजून रावण त्यांच्याशी पुढे बोलू लागला, ‘या तीनही लोकांमध्ये माझ्याशी युद्ध करून माझ्या मनगटाची शिवशिव भागवू शकेल, असा कुणी बळवंत आहे का? असा कुणी असेल, तर त्याची माहिती कृपा करून मला सांगा. त्याची स्थिती, त्याची गती, त्याची प्रकृती, त्याचे लक्षण कृपा करून मला सांगा.’ रावणाचा प्रश्न ऐकताच त्याच्या मनातील भावना नारदमुनींच्या लक्षात आल्या. ते रावणाला म्हणाले, ’तुला तुझी इच्छा पूर्ण करायची असेल, तर तुला अनादी अनंत असलेल्या मुख्य देवाशी युद्ध करावे लागेल. तोच एकटा तुझे मनोरथ पूर्ण करू शकेल. इतर कोणी नाही’ रावणाने त्यावर नारदमुनींना हा देव कसा आहे, कुठे असतो, कसा भेटेल म्हणून विचारणा केली. म्हणून त्या अनादी परमेश्वराचे गुणवर्णन करण्यास नारदमुनींनी सुरुवात केली.
परमेश्वराचे गुणवर्णन
ते म्हणाले, ’हा अनादी अनंत देव म्हणजे परमेश्वर, त्याचे दोन प्रकारचे अस्तित्व आहे. त्याचे एक स्वरूप निर्गुण आहे, तर दुसरे सगुण रूप आहे. त्याची मी तुला सविस्तर माहिती सांगतो. जिथून विश्वाची निर्मिती होते, ते मूळ रूप निर्गुण आहे. तो सर्वत्र भरून राहिलेला आहे. त्याला आकार नाही, विकार नाही, विलास नाही. त्याला जन्म नाही, त्याचा नाश होत नाही. त्याच्यातून व्यय होत नाही किंवा वाढही होत नाही, म्हणून तो अविनाशी आहे. तो मायेचा ईश म्हणजे स्वामी आहे म्हणून त्याला परेश किंवा परमात्मा म्हणतात. त्याच्यापाशी दिवस आणि रात्र हा प्रकार नाही, नक्षत्रे नाहीत, ना चंद्र किंवा सूर्य. वरूण, यम, कुबेर काहीही नाही. काळ ही गोष्टच त्याच्यापाशी खोटी ठरते. असा तो अविनाशी आहे; पण तो सर्वत्र भरून राहिला आहे. त्याच्यामुळेच पंचभूते निर्माण झाली आहे, चराचर निर्माण झाले आहे. ब्रह्मा, विष्णू, शंकर हे त्या निराकाराचे सगुण अवतार आहेत. तो सर्वव्यापक निर्गुण निराकार भगवंत आहे’.
निर्गुण-निराकार परमेश्वर
नारदमुनींनी केलेले निर्गुण परमेश्वराचे वर्णन ऐकून रावण उद्विग्न झाला. त्याला कळेना या अशा परमेश्वरामुळे आपली मनिषा कशी पूर्ण होणार? रावणाने नारदमुनींना भक्तिभावाने पुन्हा नमन केले आणि त्याच्या मनातली खंत व्यक्त केली. तो म्हणाला, ’मुनीवर तुम्ही नारायणाच्या निर्गुण रूपाचे वर्णन केलेत. ज्याला रंग, रूप, गुण अस्तित्व काहीही नाही. त्याच्याशी युद्ध कसे होणार? ते अशक्य आहे. माझे बाहू युद्धासाठी शिवशिवत आहेत. माझ्याशी युद्ध करून हे शिवशिवणारे माझे बाहू शांत करू शकणारा माझ्यापेक्षा जास्त सामर्थ्यशाली या त्रिभुवनात कुणी नाही का? तुम्ही वर्णन केलेला नारायण तो माझ्याशी युद्ध करायला का येत नाही? का तोही माझ्या भीतीने लपून राहतो आहे का?’ रावणाचे बोलणे ऐकून नारदमुनींना विस्मय वाटला. त्या निराकार नारायणाबरोबर रावणाला युद्ध करण्याचे कारण काय आहे असे त्यांनी हसत हसत विचारले. त्यावर रावण नारदमुनींना म्हणाला, ’मला सनत्कुमारांनी सांगितले आहे की, नारायणाच्या भक्तीने लीन झाल्यास किंवा वैर करून त्याच्या हातून मरण आल्यास ब्रह्मत्व प्राप्त होते. सायुज्यमुक्ती मिळते. इतर देवदेवतांकडून, सुरासुरांकडून मरण आले असता जन्ममरणाचा फेर्यातून आपली सुटका होत नाही. मला हे ब्रह्मत्व प्राप्त करून घ्यायचे आहे. मला सायुज्य मुक्ती मिळवायची आहे. ती सुद्धा भक्तीने लीन होऊन नाही, तर वैर करून माझ्या बाहूमधील खुमखुमी जिरवूनच’.
ब्रह्मत्वाची प्राप्ती
धर्मऋषींच्या कथेत मंदोदरी रंगून गेली होती. पुढे काय झाले याची तिला उत्सुकता लागून राहिली होती. तिने अधीरतेने धर्मऋषींना तसे विचारले असता धर्मऋषी पुढे सांगू लागले, ’रावणाच्या इच्छेप्रमाणे त्याला ब्रह्मत्व प्राप्त कधी आणि कसे होईल हे नारदमुनी रावणाला सांगते झाले. नारदमुनी रावणाला म्हणाले, ’कृतयुग संपल्यानंतर त्रेतायुगाच्या सुरुवातीला दशरथ नावाचा राजा होईल. नारायणाचा अवतार म्हणून दशरथाच्या पोटी राम जन्माला येईल. लक्ष्मीला डावलून श्रीवत्सलांछन हृदयाशी बाळगणारा, राजीवलोचन असलेला, निळ्यासावळ्या कांतीचा, तेज:पुंज, अजानबाहू असा राम असेल. चतुर्मुखी ब्रह्मदेव, पंचमुखी शंकर, षण्मुखीकार्तिकेय, सहस्रमुखी शेष त्या रामाचे वर्णन करताना थकून जातील; पण त्यांना कुणालाच रामाचे वर्णन पूर्णपणे करता येणार नाही. देवांना त्यांचे त्यांचे स्थान देण्यासाठी, भक्तांचे रक्षण करण्यासाठी, त्यांना मोक्षसिद्धी देण्यासाठी, प्राणीमात्रांचा उद्धार करण्यासाठी, हा अवतारी पुरुष जन्म घेणार आहे. चैतन्यरूपी देह धारण करणारा हा प्रत्यक्ष नारायणच आहे. यज्ञयाग करून, त्यात बळी देणारा किंवा नानाविध वस्तूंचे दान करणार्यालाही हा प्रसन्न होणारा नाही. कारण त्यात एकतर हिंसेला स्थान आहे किंवा दातृत्वाचा अभिमान आहे. पूर्ण वैराग्य धारण करून अनन्य भक्ती करणार्या भक्ताला, प्रसंगी त्याच्याशी वैर करणार्याला तो प्रसन्न होणारा अवतार आहे. त्याच्याशी वैर करणार्या वैर्याला सुद्धा सायुज्यमुक्ती देणारा तो नारायण आहे’.
अनन्य भक्ती
नारदमुनींनी त्यानंतर अनन्य भक्ती म्हणजे काय? ती कशी करावी म्हणजे राम प्रसन्न होतो याची सविस्तर माहिती रावणाला दिली. रावणाला रामाकडून मुक्ती मिळवायची होती; पण ती भक्तिमार्गाने नाही, तर रामाशी वैर करून. ते वैर कसे करावे हे समजावून घेण्यासाठी रावण उतावीळ झाला होता. नारदमुनी पुढे बोलू लागले, ’रामाशी वैर करायचे मनात असेल, तर तशी अंगात खुमखुमी हवी. केलेले वैरही निभावता यायला लागते. असे जन्मभर वैर साधले तरच नारायण प्रसन्न होतो. मरण प्राप्त झाले तरी हे वैर सरता कामा नये. असे वैर साधलेस, तरच तुला मुक्ती प्राप्त होईल. आता तुला कोणत्या मार्गाने जायचे आहे ते तू ठरव’. नारदमुनींचे बोलणे ऐकून रावणाने न राहून त्यांना विचारले की, ’रामाशी माझे घनघोर युद्ध व्हावे आणि त्यात रामबाणांनी माझे प्राणांचे हरण व्हावे अशी माझी अंतरीची इच्छा आहे. रामाचा अनन्य भक्त होऊन भक्तिमार्गाने मला मुक्ती मिळवायची नाही, तर रामाशी वैर साधून मला सायुज्यमुक्ती प्राप्त करून घ्यायची आहे. हे त्रिकालज्ञानी नारदमुनी मी काय केले असता रामाशी माझे हाडवैर होईल आणि माझी अंतरीची इच्छा पूर्ण होईल असे एखादे कारण कृपा करून मला सांगा, तो मार्ग मला दाखवा’.
रावणाच्या विचारण्यावरून नारदमुनी त्याला म्हणाले, ’रामाच्या पत्नीचे हरण केले असता असे वैर निर्माण होईल. दशरथाच्या आज्ञेप्रमाणे राम सीतेला घेऊन दंडकारण्यात येईल, त्यावेळी तू साधुसंन्याश्याच्या वेशात जा आणि सीतेचे हरण कर. तुझे रामाशी दृढ वैर व्हायला ते कारण पुरेसे होईल. राम वानरसेना जमवून तिचा शोध घेत घेत लंकेत येईल. त्यावेळी सीता रामाला परत करण्याचा सल्ला बिभीषणासह तुझे इतर बंधू तुला देतील. तोच सल्ला तुझे प्रधानही देतील. लंकेत आलेला रामही युद्ध टाळण्यासाठी अंगदाला बोलणी करण्यासाठी पाठवील आणि शेवटी तुझी पत्नी मंदोदरीही तुझी समजूत काढण्यासाठी येईल. या कुणाचाही सल्ला तू ऐकू नकोस. तरच रामाशी घनघोर युद्ध करण्याची तुझी खुमखुमी पूर्ण होईल. रामबाणांनी तुला सायुज्यमुक्ती मिळेल; मात्र मंदोदरीला तुझे मनोगत सांग’ धर्मऋषींची कथा संपली. ती कथा ऐकून मंदोदरीचा अस्वस्थपणा कमी झाला. तिचे मन शांत झाले. रावणाने सीतेचे हरण का केले आहे आणि सगळ्यांनी सल्ला देऊनही रावण सीतेला रामाकडे परत पाठविण्यास का तयार नाही, या सगळ्या गोष्टींचा उलगडा मंदोदरीला झाला होता. धर्मऋषींना तिने भक्तिभावाने वंदन केले. मंदोदरीला आशीर्वाद देत धर्मऋषी आपल्या आश्रमाकडे परतले. धर्मऋषींनी सांगितलेली कथा ऐकल्यावर मंदोदरीचा उर अभिमानाने भरून आला आणि रामाबरोबर रावणालाही तिने मनोमनी वंदन केले.
(आधार: संत एकनाथकृत भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय २४)
Related
Articles
किरकोळ महागाई दर ५.५४ टक्क्यांवर
13 Oct 2026
जिबूतीजवळ बोट उलटून १०९ जणांचा मृत्यू
12 Oct 2026
खडकवासला धरण परिसरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्सचे सांडपाणी थेट धरणात
14 Oct 2026
दाते मुद्रणालयाला महापौरांच्या आदेशाने टाळे
08 Oct 2026
कोणत्याही अब्जाधीशाला भारताचे धोरण ठरवता येत नाही
11 Oct 2026
केतन हत्याकांड प्रकरणातील डिजिटल पुरावे एकत्र
08 Oct 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भारतातील भूजलात सतत घट
2
‘क्रांतिवीर’ नाना काळाच्या पडद्याआड
3
लेहमध्ये महाराष्ट्रीयन चूल मांडणारी ग्रीष्मा
4
महागाईचा रेटा (अग्रलेख)
5
नानांची ‘एक्झिट’- ही तर समाजाची हानी
6
वाचक लिहितात