केळकर रस्त्यावर ध्वनिक्षेपकांचा दणदणाट   

पुणे : स्पीकर आणि विद्युत रोषणाईसाठी प्रसिद्ध असलेल्या केळकर रस्त्यावरची परंपरा यंदाही कायम राहिली. ढोल-ताशा पथकांसह ध्वनिवर्धकांच्या भिंती,  पौराणिक देखाव्यांसह गणरायाला केलेली आकर्षक सजावट, रंगबेरंगी फुलांची आकर्षक सजावट, विद्युत रोषणाईचा झगमगाट अशा उत्साही वातावरणात केळकर रस्त्यावरील विसर्जन मिरवणूक लक्षवेधी ठरली. 
 
शुक्रवारी दुपारी अडीच वाजता मिरवणूकीला सुरुवात झाली. विजय मित्र मंडळ हे पहिले मंडळ येथून पार पडले. तर शनिवारी साडेचार वाजता या रस्त्यावरील मिरवणूकीची सांगता झाली. मिरवणूकीचा शेवट ’सम्राट ट्रस्ट मंडळाने झाली. या दरम्यान तरूणांनी स्पीकर्सवर वाजणार्‍या हिंदी-मराठी गाण्यांवर ठेका धरला. 
 
दोन मंडळांच्यामध्ये बरेच अंतर असल्याने या रस्त्यावर दरवर्षी दुपारी दोनपर्यंत समाप्त होणारी मिरवणूक यंदा साडेचारपर्यंत चालली. संपूर्ण मिरवणूकीत वेगवेगळ्या प्रकारचे देखावे मंडळांनी सादर केले होते. ज्यामध्ये बरेच देखावे हे  दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देणारे होते. अजित पवार यांच्या प्रतिमेचा आणि कृत्रिम बुध्दिमत्तेचा वापर करून देखाव्यांना तयार केले होते. सूर्योदय मित्र मंडळाने शिवशंकराचा तांडव करतानाचा देखावा सादर केला होता. तर नायडू गणपती मंडळाने राधा-कृष्णाचा अतिशय सुंदर देखावा सादर केला होता. तसेच अपोलो तरूण मंडळाने निसर्ग आणि मानव यांच्या संघर्षावर आधारीत प्रसिद्ध अवतार या चित्रपटावरील आकर्षक देखावा सादर केला होता.   
 
सार्वजनिक दणदणाटाविरुद्ध जनसामान्यांतून आवाज उठल्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवाची विशेष चर्चा रंगली होती. तसेच गणपती स्थापने आधी आणि विसर्जन मिरवणूकीपूर्वी पोलिसांनी गणेश मंडळांशी अनेकवेळा चर्चा करून यावेळी मिरवणूक लोकांना त्रास न होता पार पडेल, असे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनांना पाने पुसली गेली आहेत. 

Related Articles