महापालिकेच्या २७५ आरोग्य केंद्रांची शोधाशोध   

स्वागत मंडपात डॉक्टरच नाही 

पुणे : शहरासह उपनगरांतून लाखो नागरिक गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मध्यवर्ती भागात दाखल झाले होते. तातडीच्या वैद्यकीय सेवेसाठी महापालिकेने केलेल्या नियोजनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. महापालिकेच्या प्रमुख स्वागत मंडपाजवळच एका महिला पत्रकाराला अचानक त्रास झाल्यानंतर तातडीची वैद्यकीय मदत मिळविण्यासाठी धडपड करावी लागली. अखेर त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले.
 
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरात २७५ ठिकाणी आरोग्य शिबिरे, विविध ठिकाणी वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे नियोजन केल्याचे सांगितले होते. दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात तीन बेडचे आयसीयू, तीन वैद्यकीय अधिकारी, भूलतज्ज्ञ, चार परिचारिका आणि अटेंडंट २४ तास उपलब्ध ठेवण्यात येणार असल्याची माहितीही आरोग्य विभागाने दिली होती. विसर्जन मिरवणुकीसाठी रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथके तैनात असल्याचा दावाही करण्यात आला होता.

कागदावरील नियोजन, प्रत्यक्षातील गैरहजेरी

महापालिकेने गणेशोत्सवासाठी २७५ ठिकाणी आरोग्य शिबिरांचे नियोजन केले होते. तसेच १९ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी १०८ सेवेला पत्र देण्यात आले होते.
 
विविध विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथके तैनात करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र, महापालिकेच्या प्रमुख स्वागत मंडपाजवळच तातडीची वैद्यकीय मदत उपलब्ध न झाल्याने कोट्यवधी रुपयांच्या नियोजनापेक्षा प्रत्यक्ष अंमलबजावणीवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

तातडीची वैद्यकीय मदत कधी मिळणार?

गणेश विसर्जनाच्या दिवशी शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणावर गर्दी असताना वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, महापालिकेच्या प्रमुख स्वागत मंडपाजवळच तातडीची वैद्यकीय मदत उपलब्ध न झाल्याने या संपूर्ण नियोजनाच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महिला पत्रकारालाच मदतीसाठी एवढी धडपड करावी लागली, तर गर्दीत एखाद्या सामान्य नागरिकाची प्रकृती अचानक बिघडल्यास त्याला तातडीची वैद्यकीय मदत कितपत मिळणार? असा सवाल या घटनेनंतर उपस्थित होत आहे. 

मला आदेश नाही, तुम्ही १०८ ला कॉल करा

प्रत्यक्ष विसर्जनाच्या दिवशी महापालिकेच्या स्वागत मंडपातच डॉक्टर उपलब्ध नसल्याचे समोर आले. एका महिला पत्रकाराला अचानक त्रास झाल्यानंतर वैद्यकीय मदतीसाठी विचारणा करण्यात आली. मात्र, तत्काळ उपचार किंवा वैद्यकीय पथक उपलब्ध करून देण्याऐवजी त्यांना उपचारासाठी स्वत:च धावपळ करावी लागली. विशेष म्हणजे, टिळक चौकात महापालिकेच्या मंडपामागे रुग्णवाहिका उभी होती. मात्र, त्यातील डॉक्टरांनी आदेश मिळाल्याशिवाय रुग्णवाहिका घेऊन जाता येणार नाही, असे सांगितले. संबंधितांना १०८ क्रमांकावर फोन करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे रुग्णवाहिका उपलब्ध असूनही गरजेच्या वेळी तिचा उपयोग करता आला नसल्याचे चित्र निर्माण झाले.

Related Articles