कुमठेकर रस्त्यावर गाण्यांच्या तालावर थिरकली तरूणाई   

दोन मंडळातील दीर्घ अंतरामुळे लांबली मिरवणूक

पुणे : ’मैं हू डॉन’, ’ले गई दिल मेरा मनचली’, ’पाटील आला-पाटील आला’ यासह डीजेवर वाजलेल्या हिंदी मराठी गीतांच्या तालावर कुमठेकर रस्त्यावर यंदाही गणेश विसर्जन मिरवणुकीत तरूणाई थिरकली. दोन मंडळातील दीर्घ अंतरामुळे या रस्त्यावर मंडळे कमी असतानाही मिरवणूक लांबली. सदाशिव पेठेतील बाल राजाराम मंडळाच्या मिरवणुकीने कुमठेकर रस्त्यावरील मिरवणुकीस सुरूवात झाली. 
 
कुमठेकर रस्त्यावरील पहिले बाल राजाराम मंडळ दुपारी बारा वाजून एकेचाळीस मिनिटांनी टिळक चौकात आले तर तब्बल तीन तासांनी दुसरे बालगणेश  मित्र मंडळ दुपारी तीन वाजून ४२ मिनिटांनी टिळक चौकात आले. शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंत ६२ मंडळे ठिळक चौकातून विसर्जनासाठी मार्गस्थ झाली. 

पारंपरिक वाद्यांनी वेधले लक्ष

कुमठेकर रस्त्यावर गणेश विसर्जन मिरवणूकीत पारंपारिक वाद्यांनी गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेतले. डिजेचा दणदणाट सुरू झाला तर भाविकांची गर्दी कमी दिसून आली. केवळ मंडळाचे कार्यकर्तेच डीजेच्या तालावर थिरकताना पाहायला मिळाले. मात्र पारंपरिक ढोल-ताशा, लेझीम पथकांचा दणदणाट बालगोपाळांपासून अबाल वृध्दांपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा खिळवून ठेवणारा होता. ही गर्दी वादन पूर्ण होईपर्यंत थांबून राहत होती.
 
फुलांची सजावट असलेले रथ, पौराणिक देखावे हे या रस्त्यावरील आकर्षण ठरले. पोलिसांची कुमक अधिक असूनही शुक्रवारी रात्रभर दोन मंडळामधील अंतर कमी करण्यासाठी कोणतीही हालचाल करताना दिसून आले नाहीत. त्यामुळेही मंडळांमधील अंतर अधिक दिसून आले. सायंकाळी सहा नंतर कुमठेकर रस्त्यावर मंडळे येण्याचे प्रमाण हळूहळू वाढू लागले. मानाचे पहिले पाच गणपती टिळक चौकातून पुढे मार्गस्थ होईपर्यंत केवळ दोनच मंडळे मार्गस्थ झाली होती. यावरूनच ही मिरवणूक दीर्घकाळ पहिल्या टप्प्यातच दिसून आले. 
 
रात्री आठ वाजेपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा डीजेच्या तालावर नाचण्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांबरोबरच मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या तरूणाईनेही ठेका धरल्याने आनंद ओसंडून वाहत असल्याचे चित्र दिसून येत होते. त्यातही मुलींची संख्या अधिक होती. डीजेच्या आवाजाची घातलेली मर्यादा शुक्रवारी रात्री अनेक मंडळांनी पाळली मात्र काही मंडळांच्या डीजेचा कर्णकर्कश आवाज हा चर्चेचा विषय ठरला. त्यावर कोठेही पोलिसांकडून अटकाव केल्याचे पाहायला मिळाले नाही. 

गावाकडील ढोल-ताशा-झांज पथकाने वेधले लक्ष

कुमठेकर रस्त्यावरील न्यू साईनाथ मंडळाच्या  विसर्जन मिरवणूकीत मावळ तालुक्यातील कडधे येथील ढोल-ताशा -झांज पथकाने आपल्या या पारंपरिक वाद्याच्या दणदणाटाने भाविकांना रस्त्याच्या दुतर्फा खिळवून ठेवले. गावाकडील ढोल पथकामध्ये कमी लोकांत केलेले खेळाचे सादरीकरण हे भाविकांना भावले. यानिमित्ताने शहरातील विविध पथकांच्या फुटलेल्या पेवांमध्ये ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या ढोल पथकांना भविष्यात संधी निर्माण होण्याची चिन्हे आहेत. 

बारानंतर मिरवणूका थंडावल्या

कुमठेकर रस्त्यावर रात्री बारा वाजेपर्यंत टिळक चौकातून केवळ नऊच मंडळे विसर्जनासाठी मार्गस्थ झाली. त्यानंतर मंडळांचे डीजे वादन थांबले आणि मिरवणूक संथ गतीने मार्गस्थ होत राहिल्या. रात्री बारा ते शनिवारी सकाळी सहा वाजेपर्यंत केवळ २० मंडळे  मार्गस्थ झाली. सकाळी सहानंतर डीजेचा दणदणाट सुरू झाला. सकाळी सहा ते दुपारी १ वाजेपर्यंत ३६ मंडळे मार्गस्थ झाली. म्हणजेच एकूण ६५ मंडळांच्या मिरवणूका पूर्ण झाल्या. मात्र रात्रभर रखडलेल्या गणेश मंडळांनी पुन्हा कुमठेकर रस्त्यामार्गे मिरवणूका उशीरपर्यंत सुरू ठेवल्या. 
 
यात दोन मंडळातील अंतर कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणत पोलिस फौजफाटा रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले. डीजेच्या वाढलेल्या आवाजाकडे दुर्लक्ष करीत पोलीस दोन मंडळातील अंतर कमी करण्यास प्राधान्य देताना दिसून आले. मात्र भाविकांची विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठीची गर्दी विरळ झाल्याचे पाहायला मिळाले.

Related Articles