आकर्षक रथांनी टिळक रस्ता गजबजला   

यंदा सर्वाधिक २०० मंडळांचा सहभाग 

पुणे : फुलांचा वापर करून आकर्षक सजावट केलेले रथ...आकर्षक विद्युत रोषणाईने डोळ्यांचे पारणे फेडणारे रथ...डीजे सिस्टिमबरोबरच पारंपरिक ढोल-ताशा पथकांचा मोठा सहभाग, ही टिळक रस्त्यावरील मिरवणुकीची यंदाची काही वैशिष्ट्ये ठरली. यंदा सर्वाधिक म्हणजे २०० गणपतींचे विसर्जन टिळक रस्त्यावरून झाले. 
 
शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास पूरम चौकातील वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यापासून आझाद मित्र मंडळाच्या मिरवणुकीने टिळक रस्त्यावरील मिरवणुकीला प्रारंभ झाला. नवी पेठ येथील श्रीमंत यशवंतनगर मित्र मंडळाने यंदा भव्य भगवान शंकराची धान्यस्थ मुद्रा असलेली प्रतिकृती, शेषनाग व नंदीबैल या संकल्पनेवर आधारित आकर्षक देखावा सादर केला होता. समर्थ मित्र मंडळाचा गणपती भक्तीरथात विराजमान झाला होता. सदाशिव पेठ येथील हत्ती गणपती मंडळाने मिनाक्षी रथातून मिरवणुक काढली. राजगुरू तरूण मंडळानेही ’सत्याग्रह गणपती’ यावर आधारित फुलांची सजावट असलेल्या आकर्षक रथातून डीजेच्या तालावर वाजत-गाजत मिरवणुकीवर जोर दिला. शंकर-बापाच्या देखण्या रथातून अखिल हिंगणे खुर्द तरूण मित्र मंडळाने लक्षवेधी मिरवणुक काढली. 
 
आकर्षक सजावटीच्या फुलांची मयुरगंध रथ व जाधव ढोल-ताशा पथक हे शेडगे आळीच्या टिळक रस्ता सार्वजनिक गणेश मंडळाकडून काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे आकर्षण ठरले. अमृत महोत्सवी वर्ष साजरे करणार्‍या सुर्यमुखी हनुमान मंडळाने मोरपंकी नटलेल्या आकर्षक फुलांच्या रथातून गणरायाची पारंपारिक वाद्याने मिरवणूक काढली. लक्ष्मीनगर येथील नटराज मित्र मंडळाने यंदा दोन्ही पायाच्या गुडघ्यावर बसलेली हनुमानाची भव्य प्रतिकृती ही मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या गणेशभक्तांना चांगलीच भारावून गेली. राजश्री शाहू चौक गणेशोत्सव मंडळाने ’शाहू चौकाचा राजा’ यावर आधारित विविध रंगीबिरंगी आकर्षक फुलाच्या रथातून गणयाराची डीजेच्या तालावर नाचत-गाजत मिरवणुक काढली.  
 
सायंकाळी साडेसहा वाजता ग्राहक पेठ सेवक गणेश मंडळाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. पारंपारिक वाद्य (महिला) मयूर वादन सर्वांचे आकर्षण ठरला. 
यंदा जय शिवाजी मित्र मंडळाने ’जनताचा महाराजा’ यावर आधारित भव्य ’राजमहल रथ’ साकारला होता. हा देखाणा रथ मिरवणुकीचे आकर्षण ठरला. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या तैलचित्राद्वारे कामगिरीवर आधारित ’सुरक्षित अन्नदाता, सुखी भव’ देखावा हा विघ्नहर्ता गणेश सेवा मंडळाने साकारला होता. हा देखावा आलेल्या भक्तांचे लक्ष वेधून गेला. टिळक रस्त्यावरून शनिवारी दुपारी दोन वाजेपर्यंत १६० गणेश मंडळ मार्गस्थ झाले. 
 
वेताळ महाराज सार्वजनिक गणेश मंडळाचा गणपतीही आकर्षक फुलांची सजावट असलेल्या रथावर विराजमान होता. धर्मवीर संभाजी तरूण मंडळ आणि धर्मवीर मित्र मंडळांकडूनही आकर्षक फुलांच्या सजावट रथातून गणयाराची मिरवणुक काढली. यंदा शिव बाल मित्र मंडळाकडून श्रीरामाची १२ फूटी प्रतिमा असलेली आकर्षक देखणी मूर्ती रथावर साकारली होती. नवजीवन गणेश सेवा तरूण मंडळ, महात्मा फुले युवक आघाडी संघटना मंडळही येथून मार्गस्थ झाले. या मंडळाने साकारलेली १५ फूटी हनुमानाची भव्य गदाधारी प्रतिकृती भाविकांचे मुख्य आकर्षण ठरले. जय भवानी मित्र मंडाळाने त्रिशुलधारी भगवान शंकराची शीर असलेली धानस्थ मुद्रातील काळ्या रंगातील प्रतिकृती आकर्षक रथामधून साकारली होती. 
 
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची सिंहासनावर विराजमान असलेली सुंदर व भव्य प्रतिकृती वाघजाई मित्र मंडळाने साकारली होती. महाराजांचे हे रूप सर्वांचे आकर्षण ठरले. सावधान मंडळाकडून साकारलेल्या आकर्षक तिरूपती बालाजी मंदिर रथावर गणेशाची मूर्ती विराजमान झाली होती. बालाजीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी उसळली. चिमण्या गणपती, हत्ती गणपती, मार्केडयार्ड गणपती, नातूबाग, अचानक मित्र मंडळ, विश्वास सांस्कृतिक मित्र मंडळ, सत्यवीर मंडळ आदी मंडळांच्या गणरायाचेही विसर्जन या मार्गावरून झाले. 
 
शुक्रवारी सायंकाळपासून टिळक रस्त्यावर स्पीकर सिस्टिम सुरू होत्या. त्यामुळे नाचण्यासाठी आलेल्या युवक-युवतींची या रस्त्यावर मोठी गर्दी होती. रात्री बाराला स्पीकर बंद झाल्यानंतर गर्दी पांगली. सकाळी पुन्हा डीजे सिस्टिम सुरू झाल्याने टिळक रस्त्यावर नाचणार्‍यांची संख्या वाढली. अकरानंतर पोलिसांनी वेगाने मिरवणूक पुढे नेण्याचे प्रयत्न सुरू केले. दत्तवाडी येथील न्यू अमर मित्र मंडळाचा गणपती या मार्गावरून सायंकाळी ४ वाजून ५३ मिनिटांनी मार्गस्थ होवून विसर्जन झाले.
 

Related Articles