लक्ष्मी रस्त्यावर रथवैभव; ‘महाकाली’पासून ‘कोणार्क सूर्य मंदिरा’पर्यंत आकर्षक देखाव्यांची पर्वणी   

पुणे : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष, ढोल-ताशांचा दणदणाट, फुलांनी सजवलेले भव्य रथ आणि पारंपरिक वेशभूषेतील वादकांच्या उत्साहाने लक्ष्मी रस्ता अक्षरशः दुमदुमून गेला. मानाच्या पाच गणपतींसह शहरातील प्रमुख गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका या मार्गावरून मार्गस्थ झाल्या. विविध संकल्पनांवर उभारलेले रथ, जिवंत देखावे, विद्युत रोषणाई आणि पुष्पसजावट पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
 
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचा ‘श्री विघ्नहर्ता’ रथ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा ‘श्री वक्रतुंड’ रथ, अखिल मंडई मंडळाचा कोणार्क सूर्य मंदिराच्या प्रतिकृतीवर आधारित रथ, गुरुजी तालीम मंडळाचा ‘माता महाकाली’ पुष्परथ आणि तुळशीबाग गणपती मंडळाचा भव्य ‘विष्णू रथ’ मिरवणुकीतील प्रमुख आकर्षण ठरले. रथांवरील बारकावे, रंगसंगती, फुलांची आकर्षक मांडणी आणि रोषणाईमुळे लक्ष्मी रस्त्याला वेगळेच वैभव प्राप्त झाले होते.

ढोल-ताशांच्या तालावर तरुणाईचा जल्लोष

रमणबाग युवा मंच, परशुराम, रुद्रगर्जना, विघ्नहर्ता, ताल, शिवमुद्रा, नादब्रह्म, गर्जना, शिवगर्जना, स्वरूपवर्धिनी, गजलक्ष्मी, श्रीराम आणि अभेद्य यांसारख्या पथकांनी सादर केलेल्या ढोल-ताशांच्या वादनाने परिसर दणाणून गेला. काही पथकांनी ‘महाकाल २.०’, ‘अग्निपथ’, ‘शिवराज’, ‘रामलखन’, ‘धुरंधर’ आणि ‘अभेद्य ताल’ यांसारख्या नव्या रचना सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
 
पारंपरिक वेशभूषेतील युवक-युवतींचे शिस्तबद्ध वादन, ध्वजपथकांचे सादरीकरण, लेझीम आणि मर्दानी खेळांनी मिरवणुकीची रंगत आणखी वाढवली. ढोल-ताशांचा नाद सुरू होताच रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या तरुणाईने नृत्याचा ठेका धरला. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच गणरायाच्या जयघोषात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

रांगोळ्या आणि फुलांनी सजला लक्ष्मी रस्ता

मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. गणेशभक्तांनी मंडळांच्या रथांवर फुलांची उधळण केली. काही ठिकाणी सामाजिक संस्था आणि व्यापारी संघटनांकडून भाविकांसाठी पिण्याचे पाणी, अल्पोपाहार आणि प्राथमिक उपचारांची व्यवस्था करण्यात आली होती. रथावरील पौराणिक प्रतिकृती, सामाजिक संदेश देणारे देखावे आणि पर्यावरणपूरक सजावट यामुळे यंदाची मिरवणूक अधिक लक्षवेधी ठरली.
 
अखिल मंडई मंडळाने यंदा ओडिशातील प्रसिद्ध कोणार्क सूर्य मंदिराची प्रतिकृती रथावर साकारली होती. सुमारे ३२ फूट उंच असलेल्या या रथावर हत्ती, सिंह आणि सूर्याच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या होत्या. मंदिराच्या स्थापत्यशैलीतील बारकावे आणि विद्युत रोषणाईमुळे रथ लक्षवेधी ठरला.
 

Related Articles