दणदणाटी मिरवणुकीला विक्रमी उशीर !   

मिरवणूक ३३ तास २७ मिनिटे 

पुणे : ढोल-ताशांचा निनाद, भगवे ध्वज, गुलालाची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात पुणेकरांनी लाडक्या गणरायाला जल्लोषात निरोप दिला. विसर्जन मिरवणुकीमध्ये ढोल ताशांचा गजर आणि ध्वनिक्षेपकांचा दणदणाट ऐकायला मिळाला. बहुतांश मंडळांनी नियमांचे उल्लंघन करत आवाजाची पातळी ओलांडली. पोलिसांनी मंडळांवर अनेक बंधने घातली होती. त्यासाठी बैठका घेतल्या होत्या. मात्र, त्याचा विसर्जन मिरवणुकांवर किचिंतही परिणाम झाला नाही. विसर्जन मिरवणूक तब्बल ३३ तास २७ मिनिटे चालली. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मिरवणूक एक तास लांबली.
 
महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यापासून मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या मिरवणुकीने सकाळी पावणेनऊच्या सुमारास सुरुवात झाली. मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन सायंकाळी ६.१०  वाजता झाले. त्यानंतर, शहरातील इतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकांनी मध्यवर्ती शहराचा परिसर गजबजून गेला. दुसर्‍या दिवशी (शनिवारी) सायंकाळी ६.१० मिनिटांपर्यंत मिरवणूक चालली. 
 
मानाच्या पाच गणपतींची मिरवणूक तुलनेने नियोजनबद्ध पद्धतीने पुढे सरकली. मानाच्या पहिल्या कसबा गणपतीपासून मिरवणुकीला सुरुवात झाली. हा पारंपरिक क्रम तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा गणपतीने सुरू ठेवला. मानाच्या गणपतींचे विसर्जन मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सव्वा तासाने लवकर झाले. अन्य महत्त्वाच्या गणपतींचे विसर्जनही वेळेत झाले. न्यायालयाच्या निर्णयानुसार रात्री ध्वनिक्षेपक बंद करण्यात आले. त्यानंतर अनेक मंडळांनी मिरवणुका जागेवरच थांबवल्या. यामुळे रात्री दहानंतर विसर्जन मिरवणुकांचा वेग कमालीचा मंदावला.

डीजेचा दणदणाट; पोलिसांचे निर्बंध चर्चेत

यंदाच्या गणेशोत्सवात सुरुवातीपासूनच डीजे आणि ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा चर्चेत होता. पोलिसांनी उच्च क्षमतेच्या ध्वनी आणि प्रकाश यंत्रणांवर निर्बंध घातले होते. प्लाझ्मा साऊंड, प्रेशर साऊंड, लेझर दिवे आदींच्या वापरास मनाई केली होती. मंडळाला जास्तीत जास्त दोन ढोल-ताशा पथकांना परवानगी होती आणि प्रमुख चौकांमध्ये स्थिर वादनासाठी दहा मिनिटांची मर्यादा ठेवली होती. आवाज तपासण्यासाठी ११२ ठिकाणी ध्वनिमापक यंत्रांसह पथके तैनात केली होती. मात्र, प्रत्यक्ष विसर्जन मिरवणुकीत सायंकाळनंतर अनेक ठिकाणी मोठ्या क्षमतेच्या ध्वनिवर्धकांचा आवाज ऐकू आला. काही मंडळांनी चार बास आणि चार टॉपची व्यवस्था केली असली, तरी प्रत्यक्ष आवाजाची पातळी मर्यादेपेक्षा अधिक होती. ढोल-ताशा पथकांच्या वादनामुळेही काही ठिकाणी ध्वनिप्रदूषणाची पातळी वाढली. रात्री बारानंतर ध्वनिक्षेपक बंद करण्यात आल्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुका पुढे सरकावल्या नाहीत. सकाळी ६ वाजता ध्वनिक्षेकांचा दणदणाट पुन्हा सुरु करण्यात आला. पोलिसांनी ध्वनिमापकाद्वारे तपासणी केली असून नियमभंग करणार्‍या मंडळांवर कारवाईचा इशारा दिला.

दगडूशेठ गणपतीच्या मिरवणुकीला चार वाजता सुरुवात 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक दुपारी चार वाजता सुरू करण्याचे नियोजन होते. पारंपरिक मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीतील गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दुपारचा वेळ निश्चित केला होता. यंदाही ही मिरवणूक दिमाखदार आणि सर्वांचे आकर्षण ठरली. लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. रात्री ८.३० च्या सुमारास  या गणपतीचे विसर्जन झाले.   (पान ५ वर)

१० हजार पोलिसांचा बंदोबस्त

विसर्जन मिरवणुकीसाठी शहरात सुमारे १० हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तीन हजार ५०० हून अधिक कॅमेर्‍यांच्या माध्यमातून गर्दीवर लक्ष ठेवण्यात आले. तसेच, १२० पथकांकडे ध्वनिमापक यंत्रे दिली होती. वाहतूक नियंत्रणासाठी प्रमुख रस्ते टप्प्या-टप्प्याने बंद करून पर्यायी मार्गांवर वाहतूक वळवण्यात आली.
 
कसबा गणपती : सकाळी ०८.४३ वाजता मिरवणुकीला सुरुवात; सायंकाळी ४.४० वाजता नातेश्वर घाटावर विसर्जन.
तांबडी जोगेश्वरी : सकाळी १० वाजता मिरवणूक सुरू; सायंकाळी ५ वाजता विसर्जन.
गुरुजी तालीम : सकाळी १०.१५ वाजता मिरवणूक सुरू; सायंकाळी ५.०५ वाजता विसर्जन.
तुळशीबाग : सकाळी १०.४५ वाजता मिरवणूक सुरू; सायंकाळी ५.३४ वाजता विसर्जन.
केसरीवाडा : सकाळी ११.१० वाजता मिरवणूक सुरू; सायंकाळी ६.१० वाजता विसर्जन.
 

Related Articles