अहिल्यानगरात भक्ती, उत्साह अन् शिस्तीचा संगम   

अहिल्यानगर : शहरातील घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये विराजमान झालेल्या गणरायाला अहिल्यानगरकरांनी भक्तिभावाने निरोप दिला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात ढोल-ताशा, टाळ-मृदंगाचा निनाद आणि गुलालाची उधळण करीत विसर्जन मिरवणुका उत्साहात पार पडल्या. महापालिकेने केलेल्या पारंपरिक जलाशयांसह कृत्रिम विसर्जन कुंडांमध्ये गणरायाचे शांततेत विसर्जन करण्यात आले.
 
शहराचे ग्रामदैवत असलेल्या मानाच्या विशाल गणपतीची सकाळी ९.३० वाजता महाआरती करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मीनल आशिया आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते आरती झाली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अभय आगरकर, अशोक कानडे, प्रा. माणिक विधाते, माजी सभापती अविनाश घुले यांसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
 
मानाचा विशाल गणपतीची मध्यरात्री १२ वाजता सांगता झाली. रुद्रनाथ व युगंधर ढोल पथकांनी वातावरणात उत्साह निर्माण केला. काही मंडळांनी डीजे व लेझरमुक्त मिरवणुकीला प्रतिसाद दिला तर काही ठिकाणी डीजेचा दणदणाट झाला. रात्री १२ नंतर नियमांचे उल्लंघन करणारे डीजे पोलिसांनी जप्त केले. मिरवणुकीसाठी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता.

Related Articles