अनाहत, अभय सुवर्णपदकापासून एक पाऊल दूर   

नागोया: भारताच्या अनाहत सिंगने स्क्वॅशमध्ये महिला एकेरीत, तर अभय सिंगने पुरुष एकेरीत अंतिम फेरी गाठत आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकाच्या दिशेने वाटचाल केली. दरम्यान, जोशना चिनप्पा आणि वेलवन सेंथिलकुमार यांना मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
 
जोशना-सेंथिलकुमार जोडीला हाँगकाँगच्या तांग मिंग हाँग-ली का यी जोडीने ११-१०, २-११, ११-१० असे पराभूत केले.तीन गेमच्या चुरशीच्या लढतीत भारतीय जोडीने दुसरा गेम सहज जिंकत पुनरागमन केले; मात्र निर्णायक गेममध्ये हाँगकाँगच्या जोडीने संयम राखत विजय मिळवला. उपांत्य फेरी गाठत भारतीय जोडीने यापूर्वीच पदक निश्चित केले होते. ४० वर्षीय जोशनाचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील सहावे पदक आहे.

अनाहतची शानदार मुसंडी

१८ वर्षीय अनाहतने जपानच्या जागतिक क्रमवारीतील सहाव्या क्रमांकाच्या सातोमी वातानाबेला ३-२ असे नमवून महिला एकेरीची अंतिम फेरी गाठली. अनाहतने सुरुवातीचे दोन गेम गमावल्यानंतर १२-१०, ११-६, ११-३ अशी सलग तीन गेम जिंकत सामना पलटवला. 
 
अंतिम फेरीत अनाहतचा सामना चान सिन युक आणि शिवसंगरी सुब्रमण्यम यांच्यातील दुसर्‍या उपांत्य फेरीच्या विजेत्याशी होईल. अंतिम फेरी गाठल्यामुळे अनाहतचे किमान रौप्यपदक निश्चित झाले आहे.
 

Related Articles