तजिंदरपालने जिंकले रौप्य   

गुलवीर, युनूस १५०० मीटरच्या अंतिम फेरीत

नागोया: भारताच्या तजिंदरपाल सिंह तूरने शनिवारी आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या गोळाफेकमध्ये रौप्यपदक पटकावले. आशियाई स्पर्धेमधील हे त्याचे तिसरे पदक ठरले. यापूर्वीच्या दोन आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणार्‍या तूरने २०.६४ मीटरची सर्वोत्तम फेक करत दुसरे स्थान मिळवले.
 
इराणच्या मोहम्मदरेझा तैयबीने २०.८१ मीटरची फेक करत सुवर्णपदक जिंकले आणि आशियाई क्रीडा स्पर्धेचा विक्रम मोडला. २०१८मध्ये तूरने नोंदवलेला २०.७५ मीटरचा विक्रम तैयबीने मागे टाकला. सौदी अरेबियाच्या मोहम्मद टोलूने २०.४८ मीटरच्या फेकीसह कांस्यपदक मिळवले. तूर सुरुवातीपासूनच पदकाच्या शर्यतीत होता; मात्र एका क्षणी तो तिसर्‍या स्थानावर घसरला. त्यानंतर पाचव्या प्रयत्नात २०.६४ मीटरची फेक करत त्याने दमदार पुनरागमन केले आणि रौप्यपदक निश्चित केले. सुवर्णपदकाची संधी त्याच्याकडे होती; मात्र अखेरच्या प्रयत्नात त्याची फेक फाऊल ठरली.

गुलवीर, युनूस १५०० मीटरच्या अंतिम फेरीत

भारताचे गुलवीर सिंह आणि युनूस शाह यांनी पुरुषांच्या १५०० मीटर धावण्याच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. गुलवीरने पात्रता फेरीत ३:४५.८२ मिनिटांची वेळ नोंदवत तिसरे स्थान मिळवले. १२ खेळाडूंच्या अंतिम फेरीसाठी तो पात्र ठरला. युनूस शाहनेही ३:४५.७४ मिनिटांची वेळ नोंदवत अंतिम फेरी गाठली. आता दोन्ही भारतीय धावपटू अंतिम फेरीत पदकासाठी आव्हान देतील.
 

Related Articles