नेमबाजीत प्रतीक्षा संपली; कमलजीत-सुरुचीला सुवर्ण   

अ‍ॅथलेटिक्समध्ये गुलवीर सिंहने पटकावले रौप्य; टेबल टेनिसमध्ये कांस्य 

आयची-नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतासाठी शुक्रवारचा सहावा दिवस चढ-उतारांनी भरलेला ठरला. भारतीय खेळाडूंनी नेमबाजी, अ‍ॅथलेटिक्स आणि टेबल टेनिसमध्ये एकूण सहा पदकांची कमाई केली. कमलजीत आणि सुरुची सिंह यांनी नेमबाजीत आशियाई विक्रमासह सुवर्णपदक जिंकत प्रदीर्घ प्रतीक्षा संपवली. अ‍ॅथलेटिक्समध्ये गुलवीर सिंहने पुरुषांच्या १० हजार मीटर धावण्यात रौप्यपदक पटकावले.

आशियाई विक्रम 

सहाव्या दिवशी भारताला पहिले मोठे पदक नेमबाजीत मिळाले. कमलजीत आणि सुरुची सिंह यांनी १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. अंतिम फेरीत भारतीय जोडीने ४८४.६ गुणांची नोंद करत आशियाई क्रीडा स्पर्धेचा तसेच आशियाई विक्रम प्रस्थापित केला.
 
सुरुचीने २४५.७, तर कमलजीतने २३८.९ गुणांचे योगदान दिले. भारतीय जोडीने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आणि अखेरपर्यंत ती कायम राखली. दक्षिण कोरियाने ४७८.० गुणांसह रौप्य, तर इराणने ४१५.८ गुणांसह कांस्यपदक मिळवले. या सुवर्णपदकामुळे भारतीय नेमबाजी पथकाला मोठा दिलासा मिळाला. १० मीटर एअर पिस्तूलच्या वैयक्तिक आणि सांघिक प्रकारांत भारताला पदक मिळाले नव्हते. कमलजीत-सुरुचीची कामगिरी आगामी नेमबाजी प्रकारांसाठीही महत्त्वाची ठरली. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन सांघिक स्पर्धेत ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर, रुद्राक्ष पाटील आणि नीरज कुमार यांच्या संघाने रौप्यपदक जिंकले. भारताने १७६२-९४ एक्स गुण मिळवले. चीनने १७६६-९५ एक्स गुणांसह सुवर्णपदक पटकावले, तर दक्षिण कोरियाला कांस्यपदक मिळाले. 

गुलवीरने बदलला पदकाचा रंग;१० हजार मीटरमध्ये रौप्य

अ‍ॅथलेटिक्समध्ये गुलवीर सिंहने पुरुषांच्या १० हजार मीटर धावण्यात रौप्यपदक जिंकत मागील आशियाई क्रीडा स्पर्धेतील कामगिरीत सुधारणा केली. त्याने २८:२९.३८ अशी वेळ नोंदवत दुसरे स्थान मिळवले. गुलवीरने २०२३च्या हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत याच प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. यंदा त्याने त्या पदकाचा रंग बदलत रौप्यपदक पटकावले. बहरीनच्या बिरहानु बाल्यूने २८:२७.५१ वेळेसह सुवर्ण, तर अल्बर्ट किप्टोने २८:३४.३८ वेळेसह कांस्यपदक जिंकले. महिलांच्या गोळाफेक स्पर्धेत मनप्रीत कौरने १७.१७ मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नासह कांस्यपदक जिंकले. चीनच्या झी जिआयुआनने १९.४० मीटरसह सुवर्ण, तर झांग लिनरूने १८.१४ मीटरसह रौप्यपदक मिळवले. भारताची कृष्णा मेनन १६.५७ मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नासह पाचव्या स्थानावर राहिली.

बरानिकाला कांस्यपदक 

महिलांच्या पोल व्हॉल्टमध्ये बरानिका इलांगोवनने भारताला ऐतिहासिक कांस्यपदक मिळवून दिले. तिने ४.१५ मीटरची सर्वोत्तम उडी नोंदवली. कझाकस्तानच्या पोलिना इवानोव्हानेही ४.१५ मीटरची उडी घेतल्याने दोघींनाही कांस्यपदक देण्यात आले. 

टेबल टेनिसमध्ये कांस्य

टेबल टेनिसमध्ये मानुष शाह आणि दिया चिताले यांच्या मिश्र दुहेरी जोडीने कांस्यपदक निश्चित केले. उपांत्य फेरीत त्यांना विद्यमान विजेत्या चीनच्या सुन यिंगशा आणि वांग चुकिन या जोडीकडून ०-४ असा पराभव पत्करावा लागला. 
 

Related Articles