साडे आठ तास रंगली मानाच्या गणपतींची मिरवणूक   

रांगोळ्यांच्या पायघड्या, सनई-चौघड्यांचे मंगल सूर आणि ढोल-ताशांचा गजर

पुणे : आकर्षक रांगोळ्यांच्या पायघड्या, ठिकठिकाणी होणारी पृष्पवृष्टी... सनई-चौघडा आणि नगारावादनाने आलेल्या मंगलमय वातावरणाची अनुभूती, चांदीच्या पालख्या, फुलांनी सजलेले रथ आणि ढोल-ताशांचा गजर अन् ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष अशा भारावलेल्या वातावरणात व पारंपरिक थाटात वैभवशाली मानाच्या पाच गणपतींना शुक्रवारी निरोप देण्यात आला. ही विसर्जन मिरवणूक साडेआठ तास रंगली.
 सकाळी नऊ वाजून ५५ मिनिटांनी सुरू झालेल्या या सोहळ्याची सायंकाळी सहा वाजून १२ मिनिटांनी पाचव्या मानाच्या गणपतीच्या विसर्जनाने सांगता झाली. पारंपरिक वाद्यांच्या साथीला पर्यावरणसंवर्धन, व्यसनमुक्ती आणि ऐतिहासिक वारशाचा संदेश देणारे देखावेही मिरवणुकीत लक्षवेधी ठरले.
 
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपतीची आरती झाल्यानंतर मुख्य मिरवणुकीला प्रारंभ झाला. या वेळी महापौर मंजूषा नागपुरे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि आमदार डॉ. नीलम गोर्‍हे उपस्थित होते. कसबा गणपतीपाठोपाठ तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा गणपती मुख्य विसर्जन मार्गावर दाखल झाले. मंडईपासून लक्ष्मी रस्तामार्गे टिळक चौकापर्यंत दुतर्फा उभ्या असलेल्या भाविकांनी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात त्यांचे स्वागत केले.

कसबा गणपतीच्या मिरवणुकीत ‘हरित’ संदेश

मानाचा पहिला श्री कसबा गणपती चांदीच्या पालखीत विराजमान झाला होता. कार्यकर्त्यांनी खांद्यावर पालखी वाहत पारंपरिक थाटात मिरवणूक काढली. रमणबाग युवा मंच, परशुराम आणि रुद्रगर्जना पथकांच्या ढोल-ताशांनी परिसर दुमदुमला. कामायनी प्रशालेतील विशेष मुलांच्या दिंडीने भाविकांचे लक्ष वेधले. पर्यावरणसंवर्धनाचा संदेश देणारा ‘हरित रथ’ आणि त्यावरील नगारा-चौघड्याचे वादन हे मिरवणुकीचे आकर्षण ठरले. बँक ऑफ इंडियाच्या अधिकारी-कर्मचार्‍यांनी ‘नशामुक्त युवा’ अभियानाद्वारे जागृती केली. कसबा गणपतीची मिरवणूक दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी टिळक चौकात पोहोचली; तर ४ वाजून ४० मिनिटांनी पांचाळेश्वर घाटावर मूर्तीचे विसर्जन झाले.

तांबडी जोगेश्वरीच्या पालखीपुढे शंखनाद

मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीही चांदीच्या पालखीत विराजमान झाला होता. अब्दागिरी आणि मानचिन्हांसह कार्यकर्त्यांनी पालखी खांद्यावरून नेली. पारंपरिक वेशभूषेतील महिला-पुरुष कार्यकर्ते, सतीश आढाव यांचे नगारावादन आणि न्यू गंधर्व ब्रास बँडच्या सुरांनी मिरवणुकीचा थाट वाढवला. विघ्नहर्ता, ताल आणि शिवमुद्रा पथकांच्या ढोल-ताशांना विष्णूनाद पथकाच्या शंखनादाची साथ लाभली. ही मिरवणूक दुपारी ३ वाजून २६ मिनिटांनी टिळक चौकात आली; सायंकाळी ५ वाजून २ मिनिटांनी मूर्तीचे विसर्जन झाले.

गुरुजी तालीमच्या ‘माता महाकाली’ रथाचे आकर्षण

मानाच्या तिसर्‍या गुरुजी तालीम गणपतीसाठी स्वप्निल आणि सुभाष सरपाले यांनी ‘माता महाकाली’ संकल्पनेवर फुलांचा रथ साकारला होता. रथाची सजावट पाहण्यासाठी मिरवणूक मार्गावर भाविकांनी गर्दी केली. जयंत नगरकर यांचे नगारावादन, अश्वराज ब्रास बँडचे सूर आणि नादब्रह्म, गर्जना व शिवगर्जना पथकांच्या ढोल-ताशांनी वातावरणात चैतन्य आणले. मिरवणुकीदरम्यान गुलालाची मुक्तहस्त उधळण करण्यात आली. कार्यकर्ते आणि गणेशभक्त गुलालाच्या रंगात न्हाऊन निघाले होते. मिरवणूक दुपारी ४ वाजून २१ मिनिटांनी टिळक चौकात पोहोचली; सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी विसर्जन झाले.

तुळशीबागच्या विष्णूरथाची मोहिनी

मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती फुलांनी सजविलेल्या भव्य ‘विष्णू रथा’त विराजमान झाला होता. मिरवणुकीच्या अग्रभागी लोणकर बंधूंचा नगारावादनाचा गाडा होता. स्व-रूपवर्धिनी, गजलक्ष्मी आणि शिवमुद्रा पथकांच्या दमदार वादनाने लक्ष्मी रस्ता दुमदुमला. तुळशीबागची मिरवणूक सायंकाळी ५ वाजून १ मिनिटाने टिळक चौकात आली; ५ वाजून ३४ मिनिटांनी मूर्तीचे विसर्जन झाले.

दगडूशेठ गणपतीची वैभवशाली मिरवणूक

श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय मोरया, मोरया जय गणेश... गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात आणि हजारो भक्तांच्या उपस्थितीत ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पांची श्री वक्रतुंड रथातून वैभवशाली सांगता मिरवणूक पार पडली. अनंत चतुदर्शी ला रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी पांचाळेश्वर घाटावरील हौदात मूर्तीचे विसर्जन करून बाप्पाला निरोप देण्यात आला.
 
सलग चौथ्या वर्षी दुपारी ४ वाजता बेलबाग चौकातून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. त्यावेळी लाडक्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी गणेशभक्तांनी अलोट गर्दी केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने उत्सवाच्या १३४ व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक अनंत चतुर्दशीला थाटात निघाली. 
 
तर, सायंकाळी ७.३० वाजता टिळक चौकात मुख्य विसर्जन रथाचे आगमन होताच हा क्षण डोळ्यात साठविण्यासाठी गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी रथाचे सारथ्य देखील यावेळी केले. श्री वक्रतुंड रथाची मांडणी यंदाची प्रतिकृती असलेल्या वृंदावनमधील प्रेम मंदिराच्या विषयाप्रमाणे करण्यात आली होती. मंदिर वास्तुकलेने प्रेरित असा हा रथ तयार करण्यात आला. रथाची संकल्पना भारतीय मंदिर वास्तु केलेवर आधारित असून त्यात पारंपरिक शिल्पकला आणि आधुनिक फॅब्रिकेशनचा सुंदर संगम भाविकांना पाहायला मिळाला.
 
मिरवणुकीत ’जय गणेश अमली पदार्थ मुक्त भारत अभियान’ जनजागृती करणारा ’मानवसेवा रथ’ अग्रभागी होता. त्यामध्ये विनायक आणि रोहन देवळणकर यांचा चौघडा व प्रमोद गायकवाड यांचे सनई वादन झाले. तसेच स्वरूपवर्धिनीचे पथक, प्रभात बँड, दरबार बँड आणि केरळचे चेंदा मेलम पथक असा लवाजमा होता. तसेच पुरुष भाविकांसह महिला गणेशभक्त देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले.

कोणार्क सूर्य मंदिर रथातून मंडई गणपतीची मिरवणूक

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या निनादात अखिल मंडई मंडळाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक निघाली. यंदा कोणार्क सूर्य मंदिर रथातून मंडई गणपतीची मिरवणूक काढण्यात आली. सुमारे ३२ फूट उंचीचा भव्य रथ आणि त्यावरील आकर्षक विद्युत रोषणाईने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ४.३० सुमारास  पांचाळेश्वर घाट येथे श्रींचे विसर्जन झाले.
 
अखिल मंडई मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदा १३३ वे वर्ष आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी कोणार्क सूर्य मंदिराच्या वास्तुशैलीवर आधारित रथ साकारण्यात आला होता. आकर्षक विद्युत रोषणाई आणि भव्य रचनेमुळे मिरवणुकीदरम्यान रथ पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली.
 
मिरवणुकीच्या अग्रभागी जयंत नगरकर बंधू यांचे सनई-चौघडा वादन, त्यामागे न्यू गंधर्व बँड, शिवगर्जना वाद्य पथक सहभागी झाले होते. पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि गणेशभक्तांच्या जयघोषात मिरवणूक मार्गस्थ झाली.
 

 

Related Articles