चारच्या पुढे बेस-टॉप ठेवल्यास गुन्हा   

साऊंड सिस्टिम जप्त करण्याचा पोलिसांचा इशारा

पुणे : गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी चार बेस आणि चार टॉपची मर्यादा निश्‍चित करण्यात आली आहे. गणेश मंडळांच्या बैठकीत पोलिस प्रशासन आणि मंडळांच्या प्रतिनिधींमध्ये याबाबत एकमत झाले आहे. एकही बेस किंवा टॉप वाढविल्यास मंडळावर थेट गुन्हा दाखल करून साऊंड सिस्टिम जप्त करण्याचा इशारा पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिला आहे. प्रेशरमेड आणि प्लाझ्मा उपकरणांच्या वापरालाही पूर्णपणे मनाई करण्यात आलेली आहे.
 
गणेश उत्सावादरम्यान कर्णकर्कश आवाजाचा होणार्‍या त्रासाविरोधात विविध भागांतील नागरिकांनी आवाज उठविला असून, डीजेमुक्त गणेशोत्सव करण्याची मागणी पुढे आली आहे. मोठ्या आवाजाचा होणारा त्रास लक्षात घेऊन पोलिसांनीही ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची भूमिका घेतली आहे. त्यानुसार विसर्जन मिरवणुकीत चार बेस आणि चार टॉप ठेवण्याबाबत जवळपास एकमत झाले आहे.या संख्येपेक्षा अधिक साऊंड उपकरणे लावून आवाजाची तीव्रता वाढविण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसांकडून कोणतीही सवलत दिली जाणार नाही. त्यामुळे मिरवणुकीत साऊंड सिस्टिमच्या संख्येत छुप्या पद्धतीने वाढ करण्याचा प्रयत्न मंडळांना महागात पडण्याची शक्यता आहे.
 
प्रेशरमेड, प्लाझ्माला बंदीच 
 
साऊंड सिस्टिमच्या संख्येवर मर्यादा आणतानाच काही विशिष्ट प्रकारच्या उपकरणांवरही पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. प्रेशरमेड आणि प्लाझ्मा उपकरणांचा वापर करू नये, अशा स्पष्ट सूचना मंडळांना देण्यात आल्या आहेत. या उपकरणांचा वापर केल्याचे आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याबरोबरच उपकरणे जप्त केली जातील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
 
नागरीकांच्या आवाजामुळे पोलिसांची भूमिका कठोर 
 
 कर्णकर्कश आवाजामुळे होणार्‍या त्रासाविरोधात नागरिकांनी रस्त्यावर उतरून डीजेवर पूर्ण बंदीची मागणी केली आहे. गोपाळ कृष्ण गोखले चौक परिसरात नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत डीजेविरोधात आंदोलन केले होते. ज्येष्ठ पत्रकारांच्या शिष्टमंडळानेही पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेऊन गणेशोत्सव डीजेमुक्त करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे उत्सवाच्या नावाखाली नियम धाब्यावर बसविणार्‍यांना मुभा न देता नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देण्याची भूमिका पोलिसांनी घेतल्याचे दिसून येत आहे.
 
मंडळांवर जबाबदारी निश्‍चित 
 
साऊंड सिस्टिमची मर्यादा पाळणे, प्रतिबंधित उपकरणांचा वापर टाळणे आणि ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करणे ही मंडळांची जबाबदारी राहणार आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाईची जबाबदारी आयोजकांवर निश्चित केली जाईल, असा संदेश पोलिसांकडून देण्यात आला आहे.
 
चार बेस आणि चार टॉपची मर्यादा ओलांडून अतिरिक्त साऊंड लावल्यास मंडळावर गुन्हा दाखल करून साऊंड सिस्टिम जप्त केली जाणार आहे. प्रेशरमेड आणि प्लाझ्मासारख्या उपकरणांच्या वापरही बंद आहे. उत्सव साजरा करताना कायद्याच्या चौकटीचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा कडक कारवाई केली जाणार आहे.
- अमितेशकुमार, पोलिस आयुक्त

Related Articles