दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार   

शिक्षणबोध , संदीप वाकचौरे 

समर्थ रामदास स्वामींच्या दासबोध ग्रंथात जीवन - शिक्षण विषयक अनेक श्लोकांचा समावेश दिसतो. समर्थांच्या श्लोकांचा गंभीरपणे विचार केला तर, त्यांनी जीवन व्यवहार, शिक्षणासंदर्भाने कितीतरी खोलवर विचार केला हे लक्षात येईल. मानवी जीवन उन्नतीसाठी शिक्षणाचा विचार खोलवर केला गेलेला आहे. त्या जीवन तत्वज्ञानाच्या दृष्टीने समर्थ आपल्या दासबोधात बरेच काही सांगत आहेत. शिक्षणाचे खरे तत्त्वज्ञान सांगणार्‍या श्लोकांचा विचार केला गेला, त्यादृष्टीने प्रत्यक्ष जीवन व्यवहारात व्यवहार केला गेला, तर मानवी जीवनाचा उध्दार झाल्याशिवाय राहणार नाही. 
 
आपल्याला शिक्षणातून काय प्राप्त करायचे आहे? असा प्रश्न कोणी विचारला तर त्याचे उत्तर असते आपल्याला ज्ञान मिळवायचे आहे. वर्तमानात ज्ञान मिळवण्याऐवजी माहिती आणि मार्क मिळवायचे आहे असेच उत्तर येईल. इतिहासात आपण निवडलेल्या शिक्षणातून ज्ञानाचा विचार केला जात होता. ज्ञानासाठी आराधना, उपासना केली जात होती. गुरूंच्या घरी जाऊन शिक्षण घेतले जात होते. आज मात्र आपल्या शिक्षणातून ज्ञानाची उपासना जवळपास थांबली आहे. विद्या, ज्ञानापेक्षा माहितीवर अधिक भर दिला जात आहे. आपले सारे शिक्षण माहितीचे शिक्षण झाल्याने विद्या म्हणजे केवळ पुस्तकातील अक्षरज्ञान झाले आहे. शिक्षणातून विद्या जणू हद्दपार झाली आहे. शिक्षण घेऊन माणसाला विचार करता येत नाही. चिकित्सक, वैज्ञानिक, सामाजिक दृष्टीकोन विकसित होत नाही. माणूस समाजशील होण्याची, विवेकी वाटचाल करण्याची आणि शहाणपण अंगी बानवण्याची गरज असताना ते घडताना दिसत नाही. माणसांच्या आयुष्यात जीवन कोठे आहे? 
 
शिक्षणात ज्ञानाचा अभाव
 
आपण जे काही जगतो आहे, त्यात जीवन नाही. शिक्षणात ज्ञान कोठे आहे? हे तर सारे फक्त माहितीत सामावलेले आहे आणि माणसांच्या जगण्यात शहाणपण कोठे आहे ? येथे फक्त हुशारीची पाठशाळा सुरू आहे. आपण शिक्षणात ज्या गोष्टी साध्य करायला हव्या होत्या, त्या गोष्टी आपण साध्य करण्याऐवजी, नको त्या गोष्टींच्यामागे लागलेलो आहोत. त्यातून जगण्याची वाट समृध्द होताना दिसत नाही. जगण्याचा प्रवास जीवनाच्या दिशेने व्हायला हवो आहे, तोही प्रवास होताना दिसत नाही. जीवनात  ज्ञानाचे उपयोजन करणे हे शिक्षणाचे ध्येय आहे. मात्र आज आपण जे शिक्षण घेतो, त्याचे प्रतिबिंब जगण्यात अधोरेखित होताना दिसत नाही. जगणे आणि शिकणे यांचे कोणतेही नाते उरलेले नाही. आपण जे जगतो, त्यात शिक्षण नाही. जे शिक्षण सुरू आहे, त्यात जगणे नाही. केवळ वाचन, पाठांतर किंवा माहिती मिळवणे हे शिक्षणाचे प्रारंभिक टप्पे आहेत. आपला शिक्षणाचा सारा प्रवास त्याच दिशेने होतो आहे. पण खरी विद्या ती आहे जी आचरणात प्रकट होते. आपण आज जे काही शिकतो आहेत, त्यातील किती गोष्टी आचरणात येतात ? हा खरा प्रश्न आहे. शाळा महाविद्यालयात संस्काराच्या गोष्टी शिकवल्या जातात, पण त्यापैकी किती गोष्टी प्रत्यक्ष जीवन व्यवहारात येतात? सांगणार्‍याचा त्या मूल्यांवर किती विश्वास आहे ? हाही प्रश्न आहे. 
 
शिक्षणासाठी माणसं केवळ वाचन करत जातात, एका अर्थाने ते वाचन म्हणजे परीक्षेसाठीची तयारी असते. त्याने जे वाचले ते आठवणीत ठेवत जातो, ते केवळ स्मरणात राहते. पण त्या वाचनाने जीवनात काही बदल घडतो का ? हा खरा प्रश्न आहे. एकूणच आपण जे काही वाचन करतो, त्यातून फक्त माहिती मिळते आहे. ती माहितो केवळ स्मरणशक्तीत राहिलो, तर तिचा उपयोग फक्त मर्यादित स्वरूपात झालेला दिसतो. शिक्षण घेत असताना माहितीचा उपयोग जर जीवन व्यवहारात होत नसेल, तर ते शिक्षण कुचकामी आहे. ज्ञानाचा जीवन उन्नतीसाठी व्यवहारात उपयोग केला नाही, तर ते शिक्षण निष्प्रभ ठरते. मग त्याचा जीवनासाठी काहिच उपयोग होत नाही. शेवटी हे लक्षात घ्यावे की, आपण शिक्षणातून जे ज्ञान मिळवले आहे, त्याचा उपयोग प्रत्यक्षात जीवन उन्नतीसाठी व्हायला हवा आहे. आपण आरोग्याविषयी शंभर पुस्तके वाचलेली असली, तरी वाचनार्‍याचे जीवन जर आरोग्यदायी स्वरूपाचे नसेल तर त्याने प्राप्त केलेल्या ज्ञानाचा उपयोग नाही. जसे केवळ योगाची पुस्तके वाचली, योगाची आसने, प्राणायम यांची माहिती मिळवली तर त्याचा काय उपयोग? मुळात हे लक्षात घ्यायला हवे की, योगा करून मिळणारे तेज चेहर्‍यावर दिसायला हवे. ते तेज चेहर्‍यावर नसेल, तर ते काही केवळ वाचून येणार नाही. वाचनातून मिळालेली माहिती प्रत्यक्ष आचरणात उतरली तरच तिला विद्या म्हणता येईल. 
 
माहितीयुक्त शिक्षण कुचकामी
 
शिक्षणाने शिस्त, विनय, प्रामाणिकपणा, सहकार्य यासारखे सदगुण प्रत्येक शिकलेल्या माणसांच्या अंगी यायला हवेत. मात्र तसे होताना दिसत नाही. धर्मग्रंथ वाचून जर सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रम्हचर्य यांचे महत्त्व समजले. त्यासंदर्भातील श्लोक, ओव्या पाठ केल्या तरी त्यातून धर्म कळणार नाही. पण जर धर्माचे श्लोक, ओव्यांमधील दडलेला अर्थ प्रत्यक्ष जीवन व्यवहारात आचरणात नसेल तर वाचलेले सारेच व्यर्थ ठरते. मग अशा स्वरूपाच्या केलेले वाचन म्हणजे केवळ माहिती, अक्षरांचेच वाचन आहे. अक्षर वाचन म्हणजे एक प्रकारे निरक्षरता आहे. एकूणच आपण वाचन करून माहिती मिळवली, तर त्या माहितीचा कोणालाही काहीच उपयोग होत नाही. माहितीने युक्त असणारे शिक्षण हे कुचकामी आहे हे लक्षात घ्यायला हवे. आपण जेव्हा शिक्षण घेतो, ज्ञान मिळवतो तेव्हा ते ज्ञान जर आचरणात उतरलेले असेल, तरच ते ज्ञान समाजात विश्वास निर्माण करते. विद्या आचरणात आणणारा विद्यार्थी किंवा व्यक्ती समाजासाठी आदर्श ठरतो. अशा व्यक्तीचे बोलणे, वर्तन आणि कृती इतरांना प्रेरणा देणार्‍या ठरतात. 
 
आपल्याकडे नेहमी म्हटले जाते की, बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. एका अर्थाने आपल्या जीवनामध्ये आपण शिकलेल्या, मिळवलेल्या माहितीचे प्रत्यक्षात लोककल्याणा करीता, जीवन उन्नतीकरीता किती उपयोग करतो हे पाहणे अधिक महत्त्वाचे आहे. त्याशिवाय शिक्षणाला कोणताच अर्थ नाही. वर्तमानातील आपल्या शिक्षण व्यवस्थेत प्राथमिक पासून ते उच्च शिक्षणापर्यंतकेवळ परीक्षेत गुण मिळवणे हेच शिक्षणाचे ध्येय बनत आहे. आपण ज्या विषयाचा अभ्यास केला आहे, त्या विषयाला पैकीच्या पैकी गुण मिळूनही त्या विषयासंदर्भात उपयोजनाचा प्रश्न निर्माण झाला, तर त्याचे उपयोजन करता येत नाही. मुळात आपण शिकतो म्हणजे काय ? तर फक्त माहिती मिळवत असतो. 
 
आपले शिक्षण आपल्याला चिकित्सक दृष्टीकोन, आकलन, विचार प्रक्रिया, सर्जनशीलता यासंदर्भाने कोणताच विचार रूजवण्यास मदत करत नाही. अनेकदा उच्च पदवी धारण केलेल्या विद्यार्थ्यांला घरातील फ्युज उडाला तर तो टाकता येत नाही. पदव्युत्तर पदवी धारण केलेला मराठी विषयाच्या विद्यार्थ्याला स्वतःचे विचारांचे प्रगटीकरण करता येत नाही. गणिताचा पदवीधर असलेल्या विद्यार्थ्याला घराला फर्शी बसवायची असेल, तर ती किती लागेल हे सांगता येत नाही. त्यामुळे विनोबा नेहमी म्हणत असे की, शिक्षण हे केवळ पाठयपुस्तकापुरते मर्यादित असून चालत नाही. पुस्तकापुरते शिक्षण असले, तर ते जीवनाच्या समस्येला सामोरे जाताना जीवनात उपयोगी पडत नाही. जशी कागदाची होडी प्रत्यक्षात पाण्यात पडली तर ती वाचवायला मदत करू शकत नाही. त्याप्रमाणे पुस्तकातील माहिती कितीही मिळवली, तरी तिचा उपयोग होत नाही. शिकलेले ज्ञान जीवनात वापरता येणे महत्त्वाचे आहे, शिक्षण घेऊनही ते वापरता येत नसेल, तर त्या स्वरूपात शिकणे म्हणजे केवळ साक्षरता प्राप्त करणे आहे. अशी साक्षरता आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देण्यास अपयशी ठरणार आहे. 
 
शिक्षणाचे उद्देष्ट
 
जगातील कोणत्याही शिक्षणाचे उद्दिष्ट हे केवळ साक्षरता प्राप्त करणे नाही हे लक्षात घेण्याची गरज आहे. ज्ञान असले तरी ते प्रत्यक्ष कामात वापरले गेले नाही, तर त्याचा उपयोग होत नाही. जीवनात शिक्षणातून पेरली गेलेली मूल्ये, आरोग्यविषयक माहिती, सामाजिक नियम प्रत्यक्ष जीवनात आचरणात आणले, तरच जीवन समृद्ध होईल हे लक्षात घेण्याची गरज आहे.
 
व्यक्तिमत्त्वाचा विकास 
 
समर्थांनी दासबोधात म्हटले आहे की, विद्या ती आचरणी आणावी । केवळ वाचून न सोडावी ॥ हा श्लोक सांगतो की, खरी विद्या ती आहे जी विद्यार्थ्यांच्या जीवन आचरणात उतरते. जसे आपण वाचन करतो, तेव्हा आपल्याला माहिती मिळते. मात्र आपण जेव्हा आचरण करतो तेव्हा त्या माहितीचे ज्ञानाचे रूपांतर घडत असते. जेव्हा ज्ञानाची प्रक्रिया घडते तेव्हा त्याचे परिणाम हे व्यक्तिमत्त्वाचा विकासाला हातभार लावणारे ठरतो. असे व्यक्तिमत्त्व म्हणजे समाज जीवनात आदर्श निर्माण करण्याच्या दिशेने पाऊल पडणे असते. त्यामुळे शाळा-महाविद्यालयात जे शिक्षण दिले जाते आहे, त्या शिक्षणाचे अंतिम ध्येय म्हणजे माहितीचे ज्ञानात रूपांतर करणे असते. त्या ज्ञानाचे प्रत्यक्ष जीवन आचरणात रूपांतर करणे आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे. 
 
शाळेत नैतिक शिक्षणाचा विचार केला जातो. त्या नैतिक शिक्षणासाठी धर्मग्रंथाचे तत्वज्ञान सांगितले जाते. त्या मूल्यांमध्ये सत्य, अहिंसा, दया, अस्तेय, ब्रम्हचर्य, संतोष, ध्यान, धारणा समाधी यांचा विचार केला जातो. मात्र आपण केवळ सत्य बोलावे असा सुविचार भिंतीवर लिहिला, सत्य शब्दाचे पारायण केले, तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. गांधीनी जीवन धर्म म्हणून सत्याचा विचार केला होता. सत्याची उपासना केल्याशिवाय जीवनात आपण स्वीकारलेल्या धर्माला कोणतेही स्थान नाही. एका अर्थाने सत्य म्हणजे धर्म आणि धर्म म्हणजे सत्य. हा दृष्टीकोन जीवन व्यवहारात यायला हवा. जसे ध्यान केल्याने जे फळ मिळते, ते केवळ ध्यानाविषयीच्या गोष्टी, पुस्तके वाचून मिळणार नाही. मूल्यांचा विचार हा प्रत्यक्षात जीवनात आचरणात येण्याची गरज असते. अन्यथा केवळ शब्दांचे पारायण केले, तर तो केवळ बाष्कळपणा ठरेल. शब्दांनी फार काही हाती लागणार नाही. त्यामुळे जीवनात काही गोष्टी शिकायच्या असतात. काही गोष्टी स्मरणात ठेवायच्या असतात, पण काही गोष्टी शिकून झाल्यावर प्रत्यक्षात आचरणात आणायच्या असतात हे लक्षात घेण्याची गरज आहे. 
 
सत्याची उपासना करताना खोटे बोलू नये हे खरे, पण खोटे बोलू नये असे म्हणून ते घडणार नाही, तर प्रत्यक्ष व्यवहारात खोटे न बोलणे आणि कोणाला न फसवणे महत्त्वाचे आहे. आपण जे काही शिकतो त्यातून इतरांना मदत करता यायला हवी. विद्यापीठीय शिक्षणातून विद्या हरवली आहे, फक्त माहितीचे पीठ मात्र त्यातून अधिक प्रमाणात बाहेर पडते आहे. ते बाहेर पडणे जे आहे, ते ना समाजाच्या हिताचे आहे, ना शिकणार्‍याच्या हिताचे आहे. त्याच प्रमाणे व्यक्तिगत हिताचे देखील ते नाही हे लक्षात घ्यायला हवे. एकूणच जीवनाला यशाच्या शिखरावर न्यायचे असेल, तर नैतिक मूल्यांचा विचार केवळ वाचून न थांबता आचरणात आणणे आवश्यक आहे हे पुन्हा पुन्हा लक्षात घेण्याची गरज आहे. त्याशिवाय जीवनात शिक्षणाचे मोल लक्षात येणार नाही. त्यामुळे जगण्याचे जीवन व्हावे असे वाटत असेल, तर शिक्षणाचा अर्थ खोलवर समजून घेण्याची गरज आहे. आपल्या शिक्षणाचे जगण्याशी तुटलेले नाते, पुन्हा प्रस्थापित करण्याचे आव्हान स्वीकारण्याची गरज आहे. ते आव्हान पेलण्याची हिम्मत केवळ माहिती देऊ शकणार नाही.

Related Articles