महागाईच्या झटक्यांनी नागरिक त्रासले   

काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका

विकास दराची आकडेवारी दिशभूल करणारी असल्याचा आरोप 

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार देशातील नागरिकांना प्रत्येक आठवड्याला वाढत्या महागाईचे उच्च शक्तीचे झटके देत आहे. दुसरीकडे विकास दराची आकडेवारी सादर करुन त्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप काँग्रेसने मंगळवारी केला.
 
युद्ध, अस्थिरता आणि पुरवठा साखळीतील व्यत्यय असूनही ७.८ टक्के  विकासदर साध्य केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांचे कौतुक केल्यानंतर काँग्रेसने महागाईसाठी सरकारला जबाबदार ठरवत जोरदार टीका केली.  एप्रिल-जून तिमाहीतील विकास दरातील ७.८ टक्के वाढ म्हणजे आर्थिक बहर नव्हे; तसेच, गुंतवणुकीबाबतची निराशाजनक भावना यात दिसून येत नाही. त्यामुळे हे आकडे भारतीय अर्थव्यवस्थेचे अत्यंत विस्कळीत चित्र सादर करतात, असा दावाही  केला. पंतप्रधान मोदींवर टीका करताना काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, पंतप्रधानांकडून  घाईघाईने साजरा करण्यात येणारा आनंदोत्सव आहे; कारण ग्राहकांचा आत्मविश्वाास थंडावलेला आहे, कौटुंबिक बचतीचे प्रमाण घटले आहे आणि कर्जाचा बोजा विक्रमी पातळीवर पोहोचला आहे.
 
महागाई स्वयंपाकघरापुरती मर्यादित राहिलेली नाही. घर बांधणी ते विजेच्या उपकरणांपर्यत ती पोहोचली आहे, असे सांगताना ते म्हणाले, गरीब आणि मध्यमवर्गीय पदार्थांच्या महागाईच्या झटक्यांनी त्रस्त झाले आहेत. तांब्याचे दर किलोमागे ८५० रुपयांवरुन १ हजार ७०० रुपये झाले. अ‍ॅल्युमिनियमचा प्रति किलोचा दर ३५० वरुन वाढून ६५० रुपये झाला. त्यामुळे एक हजार चौरस मीटर घरासाठी लागणार्‍या वीज तारांचा खर्च ५० हजार रुपयांवरुन दुप्पट होत तो एक लाख रुपये झाला. सौर पॅनेलचे दर १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहेत. पंखे आणि लटकणार्‍या पंख्यांचे दरही वाढले आहेत. घरगुती इलेक्ट्रीक उपकरणांमध्ये इस्रीच्या दरात २० टक्के, एलइडी आणि हॅलोजन दिव्याचे दरही सरासरी २० टक्के वाढले आहेत. बांधकामांच्या साहित्याच्या दर वाढले असून त्यामध्ये स्वीच, सॉकेट, प्रमुख तारा आणि मजुरीच्या दरातही वाढ झाली. वाढत्या महागाईचा ताण सामान्यांच्या खिशावर थेट पडत आहे. तरीही मोदी सरकार दुराभिमान बाळगत महागाई लपविण्याचा प्रयत्न करत असून  केवळ आकडेवारी दाखवून नागरिकांची दिशाभूल करत आहे. या वेळी रमेश यांनी इलेक्ट्रीक वस्तू, तांबे, अ‍ॅल्युमिनियम यांच्या वाढलेल्या दराची एक यादीही रमेश यांनी एक्सवर टाकली आहे. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खोट्या बातम्या निर्माण करण्यात मग्न आहेत आणि त्यांनी सामान्य माणसाचे स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्नही हिरावून घेतले आहे. सरकार प्रत्येक आठवड्याला महागाईच्या उच्च शक्तीचे झटके नागरिकांना देत आहे. 
 
 - जयराम रमेश, सरचिटणीस, काँग्रेस
 

Related Articles