गुजरातमधील सामूहिक अत्याचार प्रकरणी पाच जणांना जन्मठेप   

वडोदरा : गुजरातमध्ये दोन वर्षांपूर्वी नवरात्री उत्सवावेळी मुलीवर सामूहिक अत्याचार झाला होता. या प्रकरणाचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून वडोदरा न्यायालयाने पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.न्यायालयाच्या पॉस्को विशेष न्यायालयाने ’अत्यंत घृणास्पद कृत्य’ अशा शब्दात पाच दोषींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावत असल्याचा निकाल दिला. दोन वर्षापूर्वी नवरात्रीत अंबा मातेचा उत्सव सुरू होता तेव्हा सामूहिक अत्याचाराची घटना घडली होती. प्रकरण गंभीर असल्याचे निरीक्षण निकाल देताना न्यायालयाने नोंदविले. अतिरिक्त जिल आणि सत्र न्यायाधीश सी.एम. पवार यांनी मुमताज, अजमल, मुन्ना बंजारा, सैफ आणि शाहरुख यांना जन्मठेप ठोठावताना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पिडितेच्या कुटुंंबाला १० लाखांची नुकसान भरपाई द्यावे, असे आदेशात नमूद केले, याबाबतची महिती विशेष सरकारी वकील नयन सुखदवाला यांनी दिली. 
 
समाजात स्त्रियांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते आणि एखाद्या महिलेवर किंवा अल्पवयीन मुलीवर होणारा सामूहिक  अत्याचार ही अत्यंत गंभीर बाब आहे; न्यायालयाने या घटनेचे वर्णन ’अत्यंत घृणास्पद कृत्य’ असे केले, असे सुखदवाला यांनी पत्रकारांना सांगितले. न्यायालयाने पुढे असेही नमूद केले की, अंबा देवीला समर्पित असलेल्या नवरात्रीच्या काळात घडलेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेकडे दुर्लक्ष करता येणार नाही; तसेच सादर करण्यात आलेले पुरावे भक्कम आणि कोणत्याही वाजवी संशयापलीकडील होते, असेही त्यांनी सांगितले.
 

Related Articles