‘छात्रों की गूँज’मुळे भाजपला धडकी   

मुंबई, (प्रतिनिधी) : राहुल गांधी यांनी सुरु केलेल्या ‘छात्रों की गूंज’ मोहिमेची प्रचंड धास्ती भाजप व राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली दिसत आहे. ‘छात्रों की गूँज’ वर प्रश्न उपस्थित करण्यापूर्वी मागील १३ वर्षांत मोदी व फडणवीस यांनी विद्यार्थ्यांसाठी काय केले, हे जाहीर सांगावे, त्यांच्या सरकारने विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले असते तर दिल्लीत जंतर-मंतरसह देशभरात तरुणाई रस्तावर उतरली नसती. राहुल गांधी यांनी भाजपची झोप उडवली असल्याने त्यांना, त्यांना  जिकडे-तिकडे राहुल गांधी दिसू लागले आहेत, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यातील कार्यक्रमात राहुल गांधी व काँग्रेस पक्षावर काही आरोप केले, त्याला उत्तर देताना सपकाळ म्हणाले की, पुण्यातील ‘छात्रों की गूँज’ या कार्यक्रमाला मुलींचा प्रचंड प्रतिसाद मिळाला हे पाहून भाजपाच्या पोटात गोळा आला आहे. राहुल गांधी यांनी वर्मावरच घाव घातल्याने फडणवीस ‘छात्रों की गूँज’ वर तोंडसुख घेत आहेत. ‘कौन राहुल?’ म्हणणारेही आज दिवसरात्र त्यांचाच जप करत आहेत. भाजप सरकारला एकही परीक्षा व्यवस्थित घेता आलेली नाही, नीटसह अनेक परीक्षांचे पेपर फुटले, यामुळे प्रामाणिक व मेहनती विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले. भाजप सरकार व फडणवीस यांना यावर उत्तर देता येत नाही म्हणून ते राहुल गांधी व काँग्रेसवर खोटे आरोप करत आहेत.१२-१३ वर्षे सत्तेत बसूनही जनतेचे प्रश्न सोडवता येत नाहीत आणि विरोधी पक्षाला प्रश्न विचारत आहेत, असेही सपकाळ म्हणाले.

महिला आरक्षणाआडून मतदारसंघ फेररचना विधेयकाचा डाव 

महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेस पक्ष विरोध करत आहे, हा फडणवीस यांचा आरोप धादांत खोटा व हास्यास्पद आहे. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षण देणारा काँग्रेस हाच पहिला पक्ष आहे व विधानसभा व लोकसभेतही ३३ टक्के आरक्षण द्यावे, ही मागणीही सोनिया गांधी यांनीच लावून धरली होती. पण, भाजपाने सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष केले. आता फडणवीस व भाजप हे काँग्रेस व विरोधकांना महिला विरोधी ठरवत आहेत. महिला आरक्षण विधेयकाला कोणाचाच विरोध नाही, विरोध आहे तो भाजपच्या मानसिकतेला. कारण भाजपला महिला आरक्षण नाही तर मतदारसंघ फेररचना विधेयक मंजूर करून देशाचे दक्षिण व उत्तर असे दोन तुकडे करायचे आहेत, असा आरोपही केला.
 

Related Articles