नेपाळ-तिबेटमध्ये महाराष्ट्रातील २६२ नागरिक परतीच्या प्रतीक्षेत   

मुंबई, (प्रतिनिधी) : नेपाळ-तिबेटमधील महापुरामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. राज्य आपत्कालीन कार्यकारी केंद्राच्या अहवालानुसार, राज्यातील ४०६ नागरिक नेपाळ-तिबेट भागात अडकले होते. त्यापैकी १४४ जण मायदेशी परतले असून अजूनही २६२ नागरिक नेपाळ आणि चीनमध्ये असल्याची नोंद आहे.
 
‘रिचा टूर्स’ या संस्थेमार्फत ६० नागरिक गेले होते. त्यापैकी अद्याप संपर्क होऊ न शकलेल्या नागरिकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय, आणखी चार नागरिकांची माहिती मिळाली असून त्यांच्याशीही संपर्क साधता आलेला नाही.
 
दरम्यान, भारतीय नागरिकांची यादी परराष्ट्र मंत्रालयाकडून प्राप्त झाली असून तिची तपासणी करून संबंधितांशी संपर्क साधला जात आहे. राज्य सरकारच्या आपत्कालीन यंत्रणेकडून अडकलेल्या नागरिकांची माहिती जिल्हानिहाय तपासली जात असून, प्रवासी संस्था आणि कुटुंबीयांच्या हेल्पलाइनद्वारे सातत्याने संपर्क ठेवण्यात येत आहे. अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनी प्रशासनाशी संपर्क साधावा आणि उपलब्ध माहिती तातडीने शेअर करावी, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून करण्यात आले आहे. २६ ते ३१ ऑगस्टदरम्यान महाराष्ट्रातील नागरिकांच्या परतीसाठी विविध मार्गांचा वापर करण्यात आला. नागपूरमार्गे १०५, मुंबईमार्गे ३७ आणि आणखी २ नागरिक अशा एकूण १४४ नागरिकांनी भारतात प्रवेश केला आहे. सध्या २६२ नागरिक नेपाळ आणि चीनमध्ये असल्याची नोंद आहे.
 

Related Articles