गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्ते, पदपथ, स्वच्छता बाबींचा आयुक्तांकडून आढावा   

पिंपरी, :- गणेशोत्सवाच्या अनुषंगाने विद्युत तारा व जोडण्यांची सुरक्षितता तपासून  संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून  कार्यवाही करावी. कृत्रिम विसर्जन हौदांची तयारी, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था आणि सुरक्षा व्यवस्था वेळेत पूर्ण करावी.  प्रत्येक क्षेत्रीय अधिकार्‍याने आपला प्रभाग स्वच्छ, सुंदर आणि नागरिकांसाठी सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी. पदपथ पादचार्‍यांसाठी मोकळे करावेत, सार्वजनिक स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता, झाडांची छाटणी आणि रस्त्यांची दुरुस्ती वेळेत पूर्ण करावी. बीट निरीक्षकांमार्फत अनधिकृत बांधकामांवर बारकाईने लक्ष ठेवून तातडीने निष्कासनाची कार्यवाही करावी, अशा सूचना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या.
 
पालिकेच्या  मुख्य प्रशासकीय भवनामध्ये आगामी गणेशोत्सव तसेच शहरातील विविध नागरी सुविधांच्या अनुषंगाने आयुक्त डॉ.सूर्यवंशी यांनी संबंधित विभागप्रमुख व अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. यावेळी शहरातील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे, स्वच्छता व्यवस्था, रस्ते व पदपथांची स्थिती, विद्युत सुरक्षाव्यवस्था, उद्याने, गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन हौदांची तयारी तसेच नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा आदी विषयांचा आढावा घेण्यात आला. यावेळी  आयुक्त बोलत होते.
 
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, तृप्ती सांडभोर, सह आयुक्त मनोज लोणकर, शहर अभियंता मनोज सेठिया, सह शहर अभियंता अजय सूर्यवंशी, प्रेरणा सिनकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उपआयुक्त सचिन पवार, सीताराम बहुरे, राजेश आगळे, डॉ. प्रदीप ठेंगल, अण्णा बोदडे, व्यंकटेश दुर्वास, संदीप खोत, पंकज पाटील, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, सहाय्यक आयुक्त अमित पंडित, तानाजी नरळे, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, अश्विनी गायकवाड, निवेदिता घार्गे, अजिंक्य येळे, पूजा दूधनाळे, परशुराम वाघमोडे, गोरक्षनाथ लिम्हण, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड  उपस्थित होते. गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरातील कृत्रिम विसर्जन हौदांची आवश्यक तयारी वेळेत पूर्ण करावी. विसर्जनस्थळी स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, सुरक्षा आणि नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. गणेशोत्सव काळात विविध विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून नागरिकांना  सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शहरातील विद्युत तारा व जोडण्यांची सुरक्षितता तपासावी. धोकादायक किंवा अनधिकृत विद्युत जोडण्यांबाबत संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून तातडीने कार्यवाही करावी.  रस्ते खड्डेमुक्त करण्याची कार्यवाही प्राधान्याने पूर्ण करावी.
  
क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील फुटपाथवरील अतिक्रमणे तातडीने हटवून पादचार्‍यांसाठी पदपथ मोकळे करून द्यावेत. प्रभागातील सार्वजनिक स्वच्छतागृहे नियमितपणे स्वच्छ ठेवावीत, वेळोवेळी झाडांची छाटणी करावी तसेच रस्ते सुस्थितीत ठेवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर बीट निरीक्षकांमार्फत बारकाईने लक्ष ठेवावे. नव्याने होणार्‍या अनधिकृत बांधकामांची माहिती तातडीने संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून त्यावर  कार्यवाही करावी. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी.शहरातील अनधिकृत  बांधकामांना देण्यात आलेल्या नळजोडण्या तसेच विद्युत पुरवठा खंडीत करण्याबाबत कार्यवाही करावी. असे आदेश आयुक्तांनी अधिकार्‍यांना दिले.
 
नागरिकांनी सदनिका किंवा इमारतीमधील मालमत्ता खरेदी करताना संबंधित बांधकाम अधिकृत आहे किंवा नाही, याची पडताळणी करण्याबाबत नागरिकांना अवगत करा. मंजूर बांधकाम आराखडा, आवश्यक परवानग्या आणि महापालिकेच्या संबंधित नोंदी तपासूनच सदनिका खरेदी करावी याबाबत नागरिकांना जागृत करा.महापालिकेच्या सारथी प्रणालीवर तसेच शासनाच्या संकेतस्थळांवर नागरिकांकडून प्राप्त होणार्‍या तक्रारींची संबंधित विभागप्रमुखांनी दखल घेऊन त्यांचा  निपटारा करावा. 
 
लोकप्रतिनिधींकडून महापालिकेकडे प्राप्त होणारी  निवेदने आणि तक्रारी यांची  गांभीर्याने दखल घेऊन त्यावर वेळेत कार्यवाही करावी. संबंधित लोकप्रतिनिधींना करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबत वेळेत कळवावे.शहरातील नागरिकांना अधिक चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने वाचनालये, ग्रंथालये आणि व्यायामशाळांची संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे. यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय उपलब्ध जागांचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार जागा निश्चित कराव्यात.अशा सूचनाही आयुक्त डॉ.सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.
 
 महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरात रस्त्यांना मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. पावसाचे कारण देऊन आतापर्यंत अधिकार्‍यांनी वेळ मारून नेली. मात्र गेले दोन-तीन दिवस पावसाने उघडीप  देऊनही रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीबाबत पालिकेने कोणतीही कार्यवाही केली नसल्याबद्दल नागरिक संताप  व्यक्त करत आहेत. आयुक्त नुसत्या बैठका घेऊन आदेश देत बसणार हे काम न करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाईचा बडगा  उचलणार असा सवाल नागरिक करत आहेत.

Related Articles