पुण्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध   

28 लाख 66 हजार नावे नाहीत 

30 सप्टेंबरपर्यंत दावा-हरकतींसाठी संधी
 
पुणे : निवडणुकीमध्ये मतदान करणे जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच मतदार यादीत आपले नाव योग्य पद्धतीने नोंदले आहे की नाही, याची खात्री करणे हेही महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली असून, प्रत्येक नागरिकाने आपले आणि कुटुंबातील सदस्यांचे नाव तपासण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
 
फेरपरीक्षण कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यात 90 लाख 80 हजार 173 मतदार होते. त्यापैकी 62 लाख 13 हजार 692 मतदारांनी गणना पत्रक भरून दिले आहे. तपासणीदरम्यान विविध कारणांमुळे 28 लाख 66 हजार 481 नावे वगळण्याच्या प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आली आहेत. मात्र, ही अंतिम मतदार यादी नसून संबंधित नागरिकांना दावा, हरकत आणि आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची संधी देण्यात आली आहे.
 
या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी प्रारूप यादीतील आपली नोंद गृहीत न धरता प्रत्यक्ष तपासणे आवश्यक आहे. विशेषतः घर बदललेले नागरिक, ज्येष्ठ नागरिक, नवमतदार तसेच एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर नोंदली गेलेली असल्यास त्यांनी तातडीने पडताळणी करावी. प्रारूप मतदार यादीवर 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर या कालावधीत दावे आणि हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. 
 
संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी किंवा तहसीलदार कार्यालयात अर्ज सादर करता येईल. प्राप्त दावे व हरकतींवर सुनावणी घेऊन 29 ऑक्टोबर पर्यंत निर्णय घेतला जाणार असून, अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांकडे अपील करण्याचीही तरतूद आहे. 2002 च्या मतदार यादीमध्ये स्वतःचे किंवा आई-वडील अथवा आजी-आजोबांचे नाव असल्याचे पुरावे उपलब्ध असल्यास ते जोडून नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करता येणार आहे. दुरुस्तीसाठी संबंधित पुरावे अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील.
 
अशी आहे आकडेवारी
 
• 17 लाख 83 हजार 58 मतदार आढळून आले नाहीत
• 5 लाख 91 हजार 38 मतदारांचे स्थलांतर झाले आहे
• 3 लाख 12 हजार 48 मतदार मृत आढळले
• 1 लाख 43 हजार 975 मतदारांची नावे दुबार असल्याचे आढळले
• 36 हजार 362 नावे इतर कारणांमुळे वगळण्याचे प्रस्तावित आहे.
 
यादी कुठे पाहता येईल? 
 
संबंधित मतदार नोंदणी अधिकार्‍यांचे कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार कार्यालय, मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांची कार्यालये, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे pune.gov.in संकेतस्थळ, निवडणूक आयोगाचे ECINET आणि Service Portal मतदार यादीतील नाव ही केवळ प्रशासकीय नोंद नसून नागरिकाच्या लोकशाही अधिकाराची पहिली पायरी आहे. त्यामुळे अंतिम तारखेची वाट न पाहता प्रत्येक नागरिकाने आजच आपले नाव तपासावे आणि आवश्यक असल्यास निर्धारित मुदतीत अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
नाव नसल्यास घाबरू नका; हे करा
 
प्रारूप यादीत नाव नसल्यास नागरिकांकडे ते समाविष्ट करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
• नाव समाविष्ट करण्यासाठी - नमुना क्रमांक 6
• नाव, पत्ता किंवा इतर तपशिलांत दुरुस्तीसाठी - नमुना क्रमांक 8
• एखाद्या नावाबाबत आक्षेप नोंदविण्यासाठी - नमुना क्रमांक 7

Related Articles