कांद्याच्या दरात पुन्हा वाढ   

आवक घटल्याचा परिणाम; कमी उत्पादनामुळे दरात घट नाहीच 

पुणे : पाऊस लांबल्यामुळे नवीन कांदा बाजारात दाखल होर्‍यास सुमारे दोन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. त्यात साठवणूकीतला कांदा संपत आला आहे. त्यामुळे आवकही घटली आहे. परिणामी सोमवारी घाऊक बाजारात किलोच्या दरात 2 ते 3 रूपयांनी वाढ झाली. किरकोळ बाजारातील किलोचा दर 60 ते 70 रूपयांपर्यंत पोहचला आहे. 
 
यंदा पावसाला विलंब झाला. त्यानंतर पावसाचा खंड आणि शेवटच्या टप्प्यात घटलेला पाऊस या सर्वांचा परिणाम येणार्‍या पिकांवर झाला आहे. त्यामुळे नवीन कांद्याचे उत्पादन घटणार असल्याचा अंदाज आहे. शेतकर्‍यांकडील साठवणूकीतील कांदा संपत आला आहे. उष्णतेत वाढ होत असल्यामुळे साठवणूकीतील कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ज्या शेतकर्‍यांकडे कांदा शिल्लक आहे. ते शेतकरी कांदा विक्रीसाठी बाजारात पाठवत आहेत. मात्र मुळात शिल्लक कांद्याचे प्रमाण कमी असल्यामुळे बाजारात कांद्याची आवक घटत चालली आहे. परिणामी दर वाढत आहेत. 
 
मार्केटयार्डातील कांदा विभागात काल 60 गाडीची आवक झाली. त्यास 40 ते 45 रूपये दर मिळाला. दोन दिवसांपूर्वी घाऊक बाजारात किलोला 38 ते 43 दर मिळाला होता. बाजारात खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर, जामखेड आणि कर्जत या भागातून आवक होत आहे. आवक आणखी घटणार आहे. नवीन कांदा बाजारात दाखल होण्यास नोव्हेंबर महिना उजाडणार आहे. त्यामुळे तोपर्यंत दर कमी होण्याची शक्यता कमीच असल्याचा अंदाजही व्यापारी वर्तवित आहेत. 
 
मागील दोन दिवसांपासून बहुतांश भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे तपमान आणि उकाडाही वाढला आहे. त्यामुळे कांदा खराब होण्याचे प्रमाण आणखी वाढणार आहे. कमी पावसामुळे यंदा कांद्याची लागवड उशीराने झाली आहे. त्यात पावसाने ओड दिली असल्यामुळे अनेक ठिकाणचे कांद्याचे पीक वाया जाणार असल्याची स्थिती आहे. त्यामुळे नवीन कांद्याला सुरूवात झाली, तरी आवक अधिक नसणार आहे. तसेच पावसाअभावी कांद्याचा दर्जाही सर्वसाधारण असणार असल्याचा अंदाज व्यापारी वर्तीवत आहेत. दक्षिण कर्नाट, आंध्र प्रदेश तामिळ केरळ मागणी होत आहे. 
 
दक्षिण भारतातून मागणी वाढली 
 
शहर राज्याप्रमाणे दक्षिण भारतातून कांद्याला मागणी होत आहे. मात्र दिवसेंदिवस आवक कमी होत असल्यामुळे दर वाढत आहेत. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळ या राज्यातून मागणी आहे. नवीन कांदा बाजारात दाखल होईपर्यंत ही मागणी कायम असणार आहे. आवक न वाढल्यास दर आणखी वाढत जातील. नवीन कांदा बाजारात दाखल होईपर्यंत दरात मोठी घसरण होण्याची शक्यता कमीच आहे. 
- रितेश पोमण, व्यापारी मार्केटयार्ड

Related Articles