मेस्सीची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती   

आता देण्यासारखे काहीच उरले नाही

ब्युनोस आयर्स : फुटबॉलच्या मैदानावर आपल्या अद्भुत कौशल्याने जगभरातील चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारा लिओनेल मेस्सी आता अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय संघाच्या जर्सीत दिसणार नाही. अर्जेंटिनाला विश्‍वविजेतेपद मिळवून देणार्‍या या महान फुटबॉलपटूने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तब्बल 207 आंतरराष्ट्रीय सामन्यांनंतर 39 वर्षीय मेस्सीने अर्जेंटिनाच्या जर्सीला कायमचा निरोप देण्याचा निर्णय घेतला.
 
‘हा निर्णय घेणे माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे. अजूनही त्याची वेदना मनात आहे; मात्र आता वेळ आली आहे,’ अशा भावनिक शब्दांत मेस्सीने आपल्या निर्णयाची माहिती दिली. त्याच्या निवृत्तीमुळे अर्जेंटिनाच्या फुटबॉलमधील एका सुवर्णयुगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे. 2005 मध्ये अर्जेंटिनाकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणार्‍या मेस्सीने पुढील दोन दशकांहून अधिक काळ जागतिक फुटबॉलवर आपली अमिट छाप सोडली. 2022 मध्ये विश्‍वचषक जिंकण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण झाले, तर कोपा अमेरिका विजेतेपदांनी त्याच्या कारकिर्दीला अधिक झळाळी मिळाली. 2014 च्या विश्‍वचषकाच्या अंतिम सामन्यातील पराभवाची सलही त्याने अनुभवली होती.
 
‘या जर्सीसाठी सर्वस्व दिले’
 
निवृत्तीची घोषणा करताना मेस्सीने अर्जेंटिनाच्या जर्सीबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘गेल्या काही वर्षांत आम्ही सर्व काही जिंकलो म्हणून हा निर्णय घेतलेला नाही. त्याआधीपासूनच मी या जर्सीसाठी सर्वस्व पणाला लावले. अर्जेंटिनाचा खेळाडू असल्याचा अभिमान चाहत्यांना वाटावा आणि त्यांना फुटबॉलमधून आनंद मिळावा, यासाठी मी नेहमीच मैदानावर सर्व काही दिले,’ असे तो म्हणाला. पुढील पिढीतील खेळाडूंना संधी मिळावी, यासाठीही राष्ट्रीय संघातून बाजूला होण्याची वेळ आल्याचे मेस्सीने स्पष्ट केले.
 
राष्ट्रीय संघाला निरोप; क्लब फुटबॉल सुरूच
 
अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय संघातून निवृत्ती घेतली असली तरी मेस्सीचा क्लब फुटबॉलचा प्रवास मात्र सुरू राहणार आहे. त्याचा सध्याचा क्लबशी करार 2028 पर्यंत असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या शनिवारीही मेस्सीने आपली गोल करण्याची भूक कायम असल्याचे दाखवून दिले. मेजर लीग सॉकरमधील एका सामन्यात त्याने चार गोल करत आपल्या संघाच्या 7-1 अशा मोठ्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
 
2016 मध्येही घेतली होती निवृत्ती
 
मेस्सीने यापूर्वी 2016 मध्येही आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली होती. कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाचा पराभव झाल्यानंतर पेनल्टी शूटआउटमध्ये त्याच्याकडून पेनल्टी हुकली होती. त्यानंतर निराश झालेल्या मेस्सीने राष्ट्रीय संघाला निरोप देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, चाहत्यांच्या आणि देशवासीयांच्या प्रेमामुळे तो पुन्हा राष्ट्रीय संघात परतला. त्यानंतर त्याने 2018 च्या विश्वचषकात सहभाग घेतला, संघर्ष सुरू ठेवला, पराभव आणि टीका सहन केली आणि अखेर 2022 मध्ये अर्जेंटिनाला विश्‍वचषक जिंकून दिला.आता मात्र मेस्सीने अर्जेंटिनाच्या जर्सीतील आपल्या प्रदीर्घ आणि ऐतिहासिक प्रवासाला पूर्णविराम दिला आहे. त्याच्या निवृत्तीने एका महान खेळाडूच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा अंत झाला असला, तरी फुटबॉलच्या इतिहासात ‘लिओ’ची जादू कायम स्मरणात राहील.

Related Articles