जोकोविचचा धक्कादायक पराभव   

न्यूयॉर्क : विक्रमी 24 ग्रँड स्लॅम विजेता नोव्हाक जोकोविच याला कारकिर्दीत प्रथमच यूएस ओपनच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. अर्जेंटिनाच्या मारियानो नावोने याने तब्बल चार तास 36 मिनिटे रंगलेल्या पाच सेटच्या लढतीत जोकोविचचा 7-6 (5), 5-7, 4-6, 6-2, 6-1 असा धक्कादायक पराभव केला. यूएस ओपनच्या पहिल्या फेरीत जोकोविचचा यापूर्वी 19-0 असा विक्रम होता. 2006 च्या ऑस्ट्रेलियन ओपननंतर त्याने कोणत्याही ग्रँड स्लॅम स्पर्धेतील पहिला सामना गमावला नव्हता. चौथा मानांकित 39 वर्षीय जोकोविच सामन्यादरम्यान प्रकृतीच्या समस्यांनी त्रस्त दिसला. त्याला उलटी झाली, पायांमध्येही त्रास जाणवला आणि त्याने 70 बिनतोड चुका केल्या.
 
आज मी सहजपणे खेळू शकलो नाही. कोर्टवरच मला उलट्या होत आहेत आणि ही गंभीर बाब बनली आहे, असे जोकोविचने सांगितले. लहानपणापासून जोकोविचला आपला आदर्श मानणार्‍या नावोने याने हा आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम अनुभव असल्याचे सांगितले. पुरुष एकेरीत 2021 चा विजेता आणि सातवा मानांकित दानिल मेदवेदेव याने ह्यूगो गॅस्टनचा 6-4, 6-2, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. अमेरिकेच्या टॉमी पॉलनेही कोलमन वाँगविरुद्ध पिछाडीनंतर शानदार पुनरागमन करत विजय मिळविला. महिला गटात दोन वेळची ग्रँड स्लॅम विजेती आणि 27वी मानांकित बार्बोरा क्रेज्सिकोवा हिचा कामिला रखिमोवाकडून 7-6 (4), 6-2 असा पराभव झाल्याने पहिल्या फेरीत मोठा उलटफेर झाला.
 
यूएस ओपनमध्ये प्रथमच पहिल्याच फेरीत पराभव
 
नोव्हाक जोकोविचच्या कारकिर्दीत यूएस ओपनच्या इतिहासात प्रथमच त्याला पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. यापूर्वी तो कधीही स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पराभूत झाला नव्हता. तसेच, 2006 च्या ऑस्ट्रेलियन ओपननंतर प्रथमच जोकोविच कोणत्याही ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत गारद झाला आहे.
 
सामन्यादरम्यान प्रकृती बिघडली
 
पहिला सेट गमावल्यानंतर जोकोविचने दमदार पुनरागमन करत सलग दोन सेट जिंकून आघाडी घेतली होती. मात्र, सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात त्याची प्रकृती बिघडू लागली. सामन्यादरम्यान त्याला उलटी झाल्याचे दिसून आले. त्याने इनहेलरचा वापर केला आणि औषधही घेतले. तसेच, तो वारंवार स्ट्रेचिंग करताना दिसला. पाठ आणि पायाच्या त्रासामुळेही तो सामन्यात संघर्ष करत असल्याचे दिसून आले.
 
व्हिनस पहिल्या फेरीत बाहेर 
 
दरम्यान, 46 वर्षीय व्हीनस विल्यम्स हिचाही पहिल्याच फेरीत पराभव झाला. सोफिया केनिनने तिच्यावर 6-2, 7-6 (6) अशी मात केली. महिला एकेरीत तिसर्‍या मानांकित जेसिका पेगुलाने एलेना गॅब्रिएला रुसेचा 6-3, 6-2 असा पराभव करून दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. 11व्या मानांकित मार्टा कोस्त्युकनेही स्टॉर्म हंटरवर 6-4, 6-1 अशी मात केली

Related Articles