‘अ‍ॅपल’च्या कर्मचार्‍यांवर बेरोजगारीची कुर्‍हाड   

वृत्तवेध 

हार्डवेअर-केंद्रित प्रकल्पांपेक्षा कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि नव्या सॉफ्टवेअर आर्किटेक्चरवर लक्ष केंद्रित करत ‘अ‍ॅपल इंक’ने ‘सिरी’ आणि ‘व्हिजन प्रो’शी संबंधित टीममधील सुमारे दोनशे कर्मचार्‍यांची कपात करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. या कपातीमध्ये ‘व्हिजन प्रो’ विभागातील सुमारे शंभर पदे आणि ‘सिरी’ तसेच सॉफ्टवेअर टीममधील आणखी सुमारे शंभर पदांचा समावेश आहे. कंपनीची ‘इंटेलिजंट सिस्टिम्स एक्स्पिरियन्स’ टीमही या पुनर्रचनेच्या प्रक्रियेत प्रभावित झाली आहे. ही टीम सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग विभागाचा भाग असून उपकरणांवरील काही ‘एआय’ वैशिष्ट्यांसाठी जबाबदार आहे. ‘अ‍ॅपल’ सध्या आपला ‘व्हॉइस असिस्टंट सिरी’ मोठ्या प्रमाणावर नव्याने विकसित करत आहे. 
 
जुन्या ‘सिरी’ आर्किटेक्चरची क्षमता नव्या जनरेटिव्ह ‘एआय’ तंत्रज्ञानासाठी पुरेशी नसल्याने कंपनी अधिक आधुनिक ‘एआय’ तंत्रज्ञानाची जाण असलेल्या कोडिंग आणि इंजिनीअरिंग तज्ज्ञांवर भर देत आहे. कंपनीने येत्या काळात ‘एआय’केंद्रित वैशिष्ट्ये निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ‘अ‍ॅपल’ने निवेदनात म्हटले आहे, की व्यवसाय अधिक सक्षम करण्यासाठी आणि ग्राहकांना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी काही टीममध्ये बदल केले जात आहेत. प्रभावित कर्मचार्‍यांना कंपनीतील इतर पदांसाठी अर्ज करण्याच्या संधी दिल्या जातील, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. ‘ब्लूमबर्ग’च्या वृत्तानुसार ‘व्हिजन प्रो’ हेडसेटची अत्यंत जास्त किंमत आणि त्याचे वजन यामुळे अपेक्षेप्रमाणे ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला नाही. भारतात या उपकरणाची किंमत तीन लाख रुपयांहून अधिक आहे. त्याशिवाय ‘थ्री डी इमर्सिव्ह व्हिडीओ’ सामग्री तयार करण्यासाठी प्रत्येक भागावर लाखो डॉलर खर्च होत असल्याने कंपनीसमोर खर्च आणि कमी वापरकर्ता संख्या यांचे आव्हान निर्माण झाले.
 
‘अ‍ॅपल’ने ‘व्हिजन प्रो’साठी गेमिंगवर लक्ष केंद्रित करणारी टीम मोठ्या प्रमाणावर बंद करण्याचा निर्णय घेतला असून ‘इमर्सिव्ह व्हिडीओ कंटेंट’ तयार करणार्‍या विभागाचाही आकार कमी केला आहे; मात्र ‘एआय’च्या वाढत्या स्पर्धेत मागे पडू नये, यासाठी कंपनी ‘सिरी’ आणि इतर ‘एआय’ प्रणालींच्या नव्या आर्किटेक्चरवर अधिक मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत असल्याचे या बदलांवरून दिसून येत आहे.

Related Articles