निपुण युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात   

मुंबई : भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस निपुण युद्धनौका सोमवारी सामील झाली. खोल समुद्रातील डायव्हिंग आणि बचाव क्षमता असलेल्या युद्धनौकेमुळे नौदलाची ताकद अधिकच वाढली आहे. 
 
गेल्या वर्षी आयएनएस निस्तार युद्धनौका नौदलात सामील झाली होती. त्यानंतरची ही दुसरी युद्धनौका आहे. अशी क्षमता असणार्‍या थोडक्या देशाच्या यादीत आता भारताचा समावेश झाला आहे. नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांच्या प्रमुख उपस्थितीत युद्धनौकेला नौदलात सामील करुन घेण्याचा सोहळा मुंबईत पार पडला. आयएनएस निस्तारसोबत आता निपुण नौदलाच्या विशेष डायव्हिंग, पाण्याखालील हस्तक्षेप, बचावकार्य आणि पाणबुडी बचाव सहाय्य क्षमतेत लक्षणीय वाढ करते, असे अधिकार्‍यांनी सांगितले. अशा प्रकारचे सामर्थ्य काहीच देशांच्या नौदलाकडे आहे, असे अ‍ॅडमीरल स्वामीनाथन यांनी या प्रसंगी सांगितले. समुद्रात सुमारे ३०० मीटर खोलीवरील पाणबुडीची सुटका करण्याची क्षमता युद्धनौकेत आहे. आपत्तीच्या काळात मदत आणि मानव बचाव मोहिमा राबविण्यासाठी वापर करता येणार आहे. 

 नाव : आयएनएस निपुण

 निर्माण : विशाखपट्टण

 कंपनी : हिंदुस्तान शीपयार्ड 

 लांबी : ११९.४ मीटर

 वजन : १० हजार ५०० टन

आयएनएस निपुण हे प्रामुख्याने खोल समुद्रातील डायव्हिंग आणि पाण्याखालील मोहिमांसाठी खास तयार केलेले एक जहाज आहे. हे जहाज सॅचुरेशन, एअर आणि हेलिऑक्स डायव्हिंग करण्यास सक्षम असून, तपासणी व हस्तक्षेपासाठी दूरस्थपणे चालवल्या जाणार्‍या पाण्याखालील प्रणालींनी सुसज्ज आहे. या जहाजावरील विशेष डायव्हिंग कॉम्प्लेक्स, डायनॅमिक पोझिशनिंग क्षमता आणि संबंधित जीवनरक्षक व वैद्यकीय सुविधांमुळे समुद्रात दीर्घकाळ चालणार्‍या आणि गुंतागुंतीच्या मोहिमा पार पाडणे शक्य होते, असे नौदलाने म्हटले आहे.

Related Articles