भारत, उझबेकिस्तान संरक्षण भागीदारी वाढविण्याचा प्रयत्न   

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती

ताश्कंद : भारत आणि उझबेकिस्तानने आपले संबंध सर्वसमावेशक सामरिक भागीदारीपर्यंत उंचावण्याचा निर्णय घेतला असून, दोन्ही देश युरेनियमच्या दीर्घकालीन पुरवठ्यासाठी व्यवस्था स्थापित करण्याच्या प्रक्रियेत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले.
 
उझबेक अध्यक्ष शवकत मिर्झियोयेव यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर मोदी यांनी ही माहित दिली. व्यापार, स्वच्छ ऊर्जा आणि कनेक्टिव्हिटी यासह विविध क्षेत्रांमध्ये उझबेकिस्तानसोबतचे संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने मोदी दोन दिवसांच्या ताश्कंद दौर्‍यावर होते. नागरी वापरासाठी अणुऊर्जेच्या उत्पादनाकरिता भारत उझबेकिस्तानकडून युरेनियम खरेदी करण्याचा विचार करत आहे.
 
द्विपक्षीय चर्चेच्या सुरुवातीला आपल्या मोदी म्हणाले, आम्ही आमच्या सामरिक भागीदारीचा १५ वा वर्धापनदिन साजरा करत आहोत.  या विशेष प्रसंगी, आपण आपले संबंध एका व्यापक सामरिक भागीदारीच्या पातळीवर नेत आहोत. या चौकटीअंतर्गत ठोस उद्दिष्टे निश्चित करून आम्ही पुढे वाटचाल करू.
 
पंतप्रधानांनी भोजनावेळी उझबेकिस्तानच्या अध्यक्षांसोबत झालेल्या त्यांच्या फलदायी चर्चेचा देखील उल्लेख केला. ते म्हणाले, आमची अर्थपूर्ण चर्चा झाली आणि आम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. निकट समन्वयाद्वारे आमच्या सहकार्याच्या सर्व पैलूंना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही परराष्ट्र मंत्र्यांच्या स्तरावर एक समन्वय परिषद स्थापन करू. दोन्ही बाजू विद्यमान संयुक्त आयोगाचा स्तर सचिव-स्तरावरून मंत्री-स्तरापर्यंत उन्नत करतील.दोन्ही देशांतील व्यावसायिक नेत्यांच्या सहभागाने दोन्ही बाजू एक संयुक्त व्यावसायिक शिखर परिषद आयोजित करतील. आम्ही युरेनियमच्या पुरवठ्यासाठी एक दीर्घकालीन व्यवस्था देखील स्थापित करू, असे पंतप्रधांनी नमूद केले. 

पंतप्रधान मोदींचा केला सर्वोच्च सन्मान

या दौर्‍यात उझबेकिस्तानचे अध्यक्ष शावकत मिर्झियोयेव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचा सर्वोच्च सन्मान देऊन सन्मानित केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी हा सन्मान सर्व भारतीयांना समर्पित केला. तसेच, हा सन्मान म्हणजे, भारताचा हजारो वर्षांचा सांस्कृतिक वारसा आणि देशवासियांच्या परिश्रमाचा सन्मान असल्याचे म्हटले आहे. या नवीन सन्मानासह आता पंतप्रधान मोदी यांना जगभरातील विविध देशांकडून मिळालेल्या सर्वोच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची संख्या आता ३६ वर पोहोचली आहे.
 

Related Articles